केंद्र शासनाच्या योजनेनुसार महापालिकेकडून नियोजन
पुणे – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून समाविष्ट 34 गावांमध्ये 29 ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून गर्भधारणा, बाळंतपणाची काळजी घेणे, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आजार व बाह्यरूग्ण देखभाल, आजारांचे स्क्रिनिंग व व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, वृध्दांना सेवा यासह 14 सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.
पुणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 54 आरोग्यवर्धिनी केंद्रे स्थापन करण्यात आले असून, आता समाविष्ट गावातही केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यासह कर्मचारी, औषधे ह्या शासनाकडून मंजुर करण्यात आले आहे.
समाविष्ट गावातील 29 पैकी केंद्र शासनाच्या निकषानुसार 17 गावांमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. जागा उपलब्ध नसल्यास शहरातील झोपडपट्टी भाग तसेच मनपाच्या हद्दीच्या लगतची गावे यामध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापित करण्याबाबत सूचना आहेत. ही केंद्र सुरू होत असून औषध खरेदीसह अन्य कामे अंतीम टप्यात आहेत.