पुणे – वाहनतळ चालविण्यासाठी ठेकेदारांच्या थकबाकीला लगाम घालण्यासाठी पालिका प्रशासनाने नवा फॉर्म्युला समोर आणला आहे. या वाहनतळाचा ठेका देतानाच 20 टक्के आगाऊ रक्कम आकारण्यात येणार आहे. वाहनतळांच्या ठेकेदारांकडे सध्या तब्बल साडेसहा कोटींची थकबाकी असून करोना संकटाचे कारण पुढे करत ही थकबाकी कमी करण्याची मागणी ठेकेदार करत आहेत. या थकबाकीनंतर महापालिकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात काही ठेकेदार न्यायालयात गेले आहेत.
भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी आता वाहनतळ चालविण्यासाठी देण्यात येणाऱ्या ठेकेदराकडून 20 टक्के अनामत रक्कम आगाऊ घेतली जाणार आहे. आधी ही रक्कम अवघी 2 टक्के होती. शहरात महापालिकेची 50 हून अधिक वाहनतळे असून ती भाडेकराराने देण्यात आलेली आहेत. करोनाच्या 2 वर्षांच्या काळात अनेक ठेकेदारांनी लॉकडाऊनचे कारण पुढे करत ही वाहनतळांची थकबाकी भरलेली नाही. तर, काही थकबाकीदारांची पूर्वीची थकबाकीही असून त्यांच्या मिळकतींवर बोजा चढविण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे.