पुणे –पीएमपीच्या ताफ्यातील आयुर्मान ओलांडलेल्या 41 डीझेल बसेस “सेवानिवृत्त’ झाल्या आहेत. त्यामुळे आता पीएमपी पूर्णत: “ग्रीन’ एनर्जीचा वापर करणारी पहिली सार्वजनिक परिवहन वाहतूक यंत्रणा ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात सेवा देण्यात येते. पीएमपीच्या ताफ्यातील “ग्रीन’ एनर्जीवर धावणाऱ्या 1 हजार 900 बसेस असून, यामध्ये 1590 सीएनजी आणि 310 ई-बसेस आहेत. तर ताफ्यात 41 डीझेल बसेसदेखील होत्या.
एका डीझेल बसचे आयुर्मान 10 वर्षे असते. त्यानंतर या बसेस “स्क्रॅप’ पॉलिसीअंतर्गत संचलनातून बाद करण्यात येतात. या बसेससाठी सुमारे 6 हजार लिटरपेक्षा अधिक डीझेल दररोज वापरण्यात येत होते. बसेस हद्दपार झाल्याने सुमारे 46 लाख रुपयांची बचत दरमहा होणार आहे.
मिडी बसेसचे ई-बसमध्ये रूपांतर
पीएमपीच्या ताफ्यात 233 मिडी डीझेल बस संचलनात आहेत. सध्या या बसेसचे रूपांतरण ई-बसमध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 2 बसेसची चाचणी सध्या सुरू असून, येत्या काळात सर्व मिडी बसेसचे रूपांतर ई-बसमध्ये होणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात असणाऱ्या जुन्या 41 बसेस बाद करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित मिडी बसचे रूपांतरण ई-बस करण्याची प्रक्रिया सुरू असून, याबाबत सध्या चाचणी घेण्यात येत आहे.
– राजेश रुपनवर, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी