पुणे – आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच केली. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आता उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जपून पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बालेवाडी येथे केले.
पवार यांच्या उपस्थितीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आढावा बैठक आली. यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव वंदना कृष्णा, ऑलिम्पियन अंजली भागवत, मनोज पिंगळे, मारुती आडकर, गौरव नाटेकर, निखील कानेटकर, आर्मी स्पोर्टस संस्थेचे कर्नल राकेश यादव, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदि उपस्थित होते.
बैठकीनंतर पवार म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी एकूण 400 कोटी रुपये मंजूर आहेत. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. विविध कंपन्यांचा “सीएसआर’ निधीचा उपयोग करून घेण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करण्यास सांगणार आहोत. कंपन्यांनी निधी उपलब्ध करून दिल्यास मोठा भार हलका होणार आहे.’
“महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम तयार केल्याची माहितीही या वेळी शरद पवार यांनी दिली. विद्यापीठ निर्मितीने क्रीडा व्यवस्थापन, रोजगार निर्मिती आणि पूरक उद्योग, प्रशिक्षण यांना तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. क्रीडा संस्कृती आणि खेळाडू यांच्या जडणघडणीसाठी हे विद्यापीठा दुवा ठरेल,’ असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
सध्या क्रीडा क्षेत्र खूपच गतिमान झाले आहे. आपल्याला त्याच्याबरोबर धावता आले नाही, तरी त्याच्याबरोबर जाता आले पाहिजे. त्यासाठी खेळाबरोबरच खेळ आणि खेळाडूंच्या प्रसार तसेच प्रगतीसाठी पूरक बाबींचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. तो अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठातून करणार आहोत.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
कुलगुरूंचा शोध सुरू : क्रीडा मंत्री
“या क्रीडा विद्यापीठासाठी कुलगुरू म्हणून योग्य व्यक्तीचा शोध सुरू आहे. योग्य वेळ आली की त्याचे नाव जाहीर करू. अभ्यासक्रम ठरवण्यासाठी तज्ज्ञांबरोबर चर्चा असून, त्यासाठी विद्यापीठ आयोगाकडे परवानगी घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात क्रीडा शास्त्र, क्रीडा तंत्रज्ञ, क्रीडा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन असे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी 50 प्रशिक्षणार्थींना संधी मिळेल. यासाठी एकूण 213 पदे उपलब्ध असून, यातील 166 ही नियमित आणि 47 पदे मानधनावरील असतील, असे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
सध्या क्रीडा क्षेत्र खूपच गतिमान झाले आहे. आपल्याला त्याच्याबरोबर धावता आले नाही, तरी त्याच्याबरोबर जाता आले पाहिजे. त्यासाठी खेळाबरोबरच खेळ आणि खेळाडूंच्या प्रसार तसेच प्रगतीसाठी पूरक बाबींचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. तो अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठातून करणार आहोत.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस