समन्वय कक्षाची पुनर्रचना करणार
पुणे – दक्षिण मुख्यालयांतर्गत काम करणारे सैन्य अधिकाऱ्यांच्या वेतन व इतर भत्तासंदर्भातील प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी दक्षिण मुख्यालय आणि संरक्षण लेखा विभाग (पीसीडीए) यांच्यामधील समन्वय कक्षाची पुनर्रचना केली जाणार आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून सैन्याधिकारी, दिव्यांग सैनिक आणि विधवा पत्नींच्या अर्थविषयक समस्या सोडविण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
दक्षिण मुख्यालय आणि संरक्षण लेखा विभाग यांच्या प्रतिनिधींची 24 जून रोजी पीसीडीए कार्यालय येथे पाठपुरावा बैठक झाली. या बैठकीत दक्षिण मुख्यालयाचे प्रतिनिधी म्हणून मेजर जनरल पी. एस. शेखावत आणि मेजर जनरल संदीप भार्गव हे सहभागी झाले होते. तर पीसीडीए कार्यालयाचे प्रमुख डॉ. राजीव चव्हाण, वरिष्ठ अधिकारी लेहाना सिंग आणि टी. सतीश कुमार हे सहभागी झाले होते.यापूर्वी दि. 8 जूनला मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन आणि पीसीडीए कार्यालयाचे प्रमुख डॉ. राजीव चव्हाण यांच्यामध्ये अभिप्राय बैठक घेण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन बैठकीत सैन्याधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन लाभ,डीएसओएफ फंड आणि इतर भत्ते अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशिक्षण भत्ता व त्यातील किचकट पद्धती, भाग-2च्या ऑर्डरचे ऑनलाइन वितरण वेगाने करणे, 5व्या, सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या वेतन विसंगतवर तोडगा काढणे याबाबय तसेच लष्करी अधिका-यांना त्यांचे हक्क अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगण्यासाठी वेबिनारद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देणे अशा विविध विषयांसाठी दक्षिण मुख्यालय आणि पीसीडीए कार्यालयादरम्यान असलेल्या समन्वय कक्षाची पुनर्रचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.