शेंदूर्लीतील घटना : मृतदेह सापडला नाही
राजगुरूनगर – शेंदूर्ली (ता. खेड) येथील युवक धामणगाव बुद्रुक येथे चासकमान धरण पाणी साठ्यामध्ये पोहण्यासठी गेला असता जलसाठ्याचे अंतर पार करत असताना त्याची दमछाक होऊन दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 18) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. बुडाल्या नंतर त्याचा मृतदेह अद्यापही मिळाला नाही. स्थानिक नागरिक त्याचा शोध घेत आहेत.
नितीन दत्तात्रय खंडागळे (वय 32) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शेंदूर्ली येथील खंडागळे हा धामणगाव बुद्रुक च्या हद्दीत भीमानदीत चासकमान धरणाच्या जलसाठ्यात संकेत कोरडे, ओंकार कडलग या मित्रांसोबत पोहण्यासठी गेला होता. पोहत असताना नदीतील पाणी साठ्याचे अंतर पार करताना त्याची दमछाक झाल्याने तो पाण्यात बुडाला.
बुडाल्यानंतर त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांनी आरडाओरड करीत नागरिकांना आवाज दिला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याचा पाण्यात उतरून शोध घेतला. अंधारपडेपर्यंत शोध कार्य सुरू होते. चासकमान धरणाचा या ठिकाणी मोठा जलसाठा असल्याने नदीपात्र खोल आहे. त्यामुळे त्याचा शोध लागला नाही. नदीपात्रात गाळ साचल्याने तो खाली गाळात अडकून पडल्याचा अंदाज ग्रामस्थानी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नितीन खंडागळे याचा मृतदेह पाण्यात सापडत नसल्याने खेड महसूल विभागाच्या माध्यमातून निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी एनडीआरएफ यांच्या कार्यालयात संपर्क केला. त्यांची टीम तळेगाव वरून शेंदूर्ली गावाकडे रात्री उशिरा रवाना झाल्याचे समजते मात्र अंधार असल्याने मदत कार्यात अडथळे आले आहेत. या घटनेमुळे शेंदूर्ली गावावर शोककळा पसरली. नितीन खंडागळे यांच्या मागे आई वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे.