पुणे – “आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागावरील प्रवेशासाठी राज्यातील ५१ हजार ४०० शाळांनी नोंदणी केली आहे. ६ लाख ८२ हजार ८१८ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. शाळा नोंदणीसाठी २२ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यात पुणे जिल्ह्यातील २ हजार ७९२ शाळांची नोंदणी झालेली आहे. त्यातून ४१ हजार ४८८ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत.
राज्य शासनाकड़्न आरटीई कायद्यात बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. बदलामुळे आता ज्या खाजगी शाळांच्या एक किलोमीटर परिसरात सरकारी अथवा अनुदानित शाळा आहे तिथे मुलांना खाजगी शाळांमधून शासनाकडून मोफत प्रवेश मिळणार नाही. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरुन आरटीईच्या शाळा नोंदणीची प्रक्रिया ६ मार्च पासून सुरु करण्यात आलेली आहे.
प्रवेश पात्र शाळांनी आवश्यक ती सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ट असल्याची खात्री करुनच संकेतस्थळावरुन अद्ययावत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शाळांनी दिलेल्या वेळेतच नोंदणी प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक होते. मात्र अद्यापही बहुसंख्य शाळांकडून नोंदणीची प्रक्रियाच पुर्ण झालेली नाही. यामुळे शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.