शिक्रापुरात सर्व साहित्य खाक; खिडक्यांच्या काचांसह फरशांचे तुकडे
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भुजबळ मळा येथील विमल पॅलेस बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर राहणारी युवती स्वयंपाकासाठी गॅस पेटवित असताना सिलिंडरचा भडका होत मोठा स्पोट होऊन वीस वर्षीय युवती गंभीर रित्या भाजल्याची घटना घडली. वैष्णवी अनिल कोठाळकर (वय 20, सध्या रा. शिक्रापूर भुजबळ मळा, मूळ रा. अचलपूर, जि. अमरावती) असे गंभीर जखमी झालेल्या युवतीने नाव आहे.
शिक्रापूर येथे भुजबळ मळा येथील विमल पॅलेस बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणारी वैष्णवी कोठाळकर सकाळी साडेअकराच्या सुमारास घरात स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवित असताना सिलिंडरचा मोठा भडका होऊन अचानक स्फोट झाला. दरम्यान, मोठ्याने आवाज होऊन घरात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वैष्णवी देखील गंभीररित्या भाजल्याने खाली कोसळली. दरम्यान, शेजारील नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करुन सिलिंडर बाहेर काढत जखमी वैष्णवीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार संदीप कारंडे, आत्माराम तळोले, पोलीस शिपाई उद्धव भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घरातील सर्वच साहित्य खाक झाल्याचे दिसले. घटनेत युवती गंभीर जखमी झाली असून घराबाहेर असलेला प्रथमेश राजू सरोदे हा युवक किरकोळ जखमी झाला असल्याचे समोर आले,
तर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी वैष्णवीची चौकशी देखील पोलिसांनी केली. मात्र, युवती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.दरम्यान, जखमी वैष्णवी सत्तर टक्के भाजल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सूर्या हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी सांगितले.