पुणे – प्रणव घोलकर व पृथा वर्टीकर यांनी प्रत्येकी दोन गटात विजेतेपद पटकावत फिनिक्स चषक टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. नैशा रेवसकर हिने तेरा वर्षाखालील व पंधरा वर्षाखालील मुलींच्या पाठोपाठ सतरा वर्षाखालील गटातील विजेतेपदावर मोहोर उमटवली. पुरुष गटात आदित्य जोरी विजेता ठरला.
पुरुषांच्या एकेरीत आदित्य जोरी याने भार्गव चक्रदेव याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली आणि विजेतेपद पटकाविले. ही लढत त्याने 9-11,11-8,11-6,11-6,9-11, 11-9 अशी जिंकली. महिलांच्या अंतिम सामन्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथा हिने नैशा रेवसकर हिचे आव्हान 11-5,11-7,11-7,14-12 असे परतविले. मुलींच्या 19 वर्षाखालील गटात तिने आनंदिता लुनावत हिचा 11-7,11-7,11-3,11-8 असा पराभव केला आणि अजिंक्यपद पटकावले.
मुलांच्या 19 वर्षाखालील गटात प्रणव घोलकर याने अंतिम फेरीत जय पेंडसे याला पराभूत करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने ही लढत 5-11, 8-11,9-11,11-8, 11-7, 13-11, 11-5 अशी जिंकली. 17 वर्षाखालील गटात प्रणव घोलकर याने कौस्तुभ गिरगावकर याच्यावर 7-11,11-7, 11-7, 11-8 असा सनसनाटी विजय नोंदवित अजिंक्यपद पटकाविले. मुलींच्या 17 वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत नैशा रेवसकर हिने सई कुलकर्णी हिचा 11-5,11-7, 11-4 असा सपशेल धुव्वा उडविला. या मोसमातील तिचे हे चौथे विजेतेपद आहे.
अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात मोहिल ठाकूर विजेता ठरला. अंतिम फेरीत त्याने धैर्य शहा याला 11-6,11-3,11-7 असे निष्प्रभ केले. मुलींच्या अकरा वर्षाखालील गटात स्पृहा बोरगावकर हिने विजेतेपद पटकावताना शरण्या प्रधान हिचा 11-8, 11-4,11-9 असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत ओंकार, रुचिता विजेते
खुल्या मिश्र दुहेरीचे विजेतेपद ओंकार जोग व रुचिता दारवटकर यांनी पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात भार्गव चक्रदेव व नैशा रेवसकर यांच्यावर 11-6,13-11,11-7 अशी मात केली. प्रौढांच्या अंतिम फेरीत संतोष वाकराडकर यांनी रवींद्र जोशी यांना 11-5, 11-6, 11-8 असे पराभूत केले.