लॉयला करंडक फुटबॉल
पुणे – यजमान लॉयला प्रशाला संघाने 14 आणि 16 वर्षांखालील गटातून लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मात्र, त्यांना निर्भेळ यशापासून वंचित रहावे लागले. बिशप्स प्रशाला संघाने 12 वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टाटा ऑटोकॉम्पने या स्पर्धेला आर्थिक पुरस्कार दिला होता.
12 वर्षांखालील अंतिम सामन्यात बिशप्स प्रशाला संघाने लॉयला प्रशाला संघावर 2-0 असा विजय मिळविले. हितांश खत्री आणि अबीर जाधवने सहा मिनिटांत दोन्ही गोल नोंदवले. 14 वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने नियोजित वेळेतील 2-2 बरोबरीनंतर शूट आऊटमध्ये 6-4 असा विजय मिळविला. 16 वर्षांखालील गटातही लॉयलाला विजयासाठी झगडावे लागले. सात गोलच्या सामन्यात लॉयला प्रशालेने बिशप्स प्रशालेवर 4-3 असा विजय मिळविला. बिशप्स प्रशाला संघाने 15 व्या मिनिटाला आरिझ शेखच्या गोलने आघाडी घेतली.
पण वेदांत कांबळेने 39 व्या मिनिटाला लॉयला बरोबरी साधून दिली. त्यानंतर लव्या असरानीने 53 व्या आणि वेदांत गुप्ताने 57 व्या मिनिटाला गोल करून लॉयला प्रशालेला आघाडीवर नेले. मात्र, आरिझने 54 व्या मिनिटाला आणि अथर्व फडतरेने 55 व्या मिनिटाला गोल करून बिशप्स प्रशालेला बरोबरी साधून दिली. सामना 3-3 असा बरोबरीत सुटणार असे वाटत असताना 58 व्या मिनिटाला वेदांतने गोल करून लॉयलाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ टाटा ऑटोकॉमचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद गोयल यांच्या हस्ते पार पडला. या वेळी लॉयला प्रशालेचे मुख्याध्यापक फादर अनिष, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव हरित माथारु उपस्थित होते.