दीर्घ प्रतीक्षेनंतर 9 मार्चला होणार कारखान्याची निवडणूक
लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची बहुप्रतीक्षित अशी निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. 2024 ते 2029 या पंचवार्षिकची 21 संचालकांच्या जागांसाठी 9 मार्च 2024 रोजी मतदान होणार असून दुसर्या दिवशी 10 मार्चला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा जिल्हा सहकारी निवडणूक आधिकारी निलिमा गायकवाड व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी या संदर्भात निवेदन जारी केले आहे. त्यानुसार गट क्रमांक 1, 2 व 3मध्ये संचालकांच्या प्रत्येकी 3 जागा व गट क्रमांक 4, 5 व 6 मध्ये संचालकांच्या प्रत्येकी 2 जागा, उत्पादक व बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था या गटातून 1 संचालक निवडून येईल. अनुसूचित जाती जमाती मधून 1 संचालक निवडून येईल. महिला राखीव मधून 2 संचालक निवडून येतील. इतर मागासवर्गीय मधून 1 संचालक निवडून येईल. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मधून 1 संचालक निवडून येईल.
निवडणुक अधिसूचना 5 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 11 ते 2 या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी साडे बारा वाजता उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. पात्र उमेदवारांना 28 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 9 मार्च रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता मतमोजणी होणार आहे.
यापूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 26 डिसेंबर 2023 रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, त्या यादीवर 26 डिसेंबर ते 3 जानेवारी 2024 या कालावधीत हरकती नोंदवल्या आहेत. या हरकतींवर 12 जानेवारी रोजी निर्णय घेतला असून अंतिम मतदार यादी 17 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली आहे.