बुधवारपासून नियोजन : उत्पादकांना 20 रुपये किलोने मिळणार साखर
मंचर – पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद व ऊस उत्पादकांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे दीपावली निमित्त सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार गट व गाववार साखर वाटपाचे नियोजन केले आहे. बुधवार (दि. 25) ते गुरुवार (दि. 2 नोव्हेंबर) कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत 20 रुपये प्रतिकिलो दराने गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले असून उर्वरीत कार्ड वाटपाचे काम संबंधित विभागीय शेतकी गट ऑफीसला सुरू आहे. नियोजीत साखर वाटप तारखेला फक्त स्मार्ट कार्डद्वारेच साखर वाटप करण्यात येणार असल्याने सभासद व ऊस उत्पादकांनी दिलेली स्मार्ट कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व 2022-23 गाळप हंगामात ऊस पुरविलेला आहे यांच्यासाठी (1) पूर्ण भागधारक 10 हजार रुपये व ऊस उत्पादक 80 किलो (2) फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक 60 किलो (3) अपूर्ण भागधारक व ऊस नाही 50 किलो याप्रमाणे विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी 10, 20 व 50 किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केलेले आहे.
जे सभासद/ऊस उत्पादक वरील नियोजीत कालावधीत आपआपले गावामधून साखर घेवू शकणार नाहीत त्यांना शुक्रवार (दि. 3) ते शनिवार (दि. 11 नोव्हेंबर) या कालावधीमध्ये कारखाना साइटवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वाटप केली जाणार आहे.
त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर 2024 पर्यंत प्रत्येक महिन्याचे पहिल्या शनिवारी कारखाना साइटवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे. गर्दी कमी करण्यासाठी गावोगावी साखर वाटपाचे प्रमाण विचारात घेवून काही गावांमध्ये सलग 2 दिवस वाटपाचे नियोजन केले असून सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेवून जाण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.