८० जणांना आठ दिवसांची मुदत : अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद
प्रशासनाचे नागरिकांकडून कौतुक
भोर – भोर शहरातील वाढलेली अतिक्रमणे काढण्यासाठी भोर नगरपालिकेने कारवाई सुरू केली असल्यामुळे रस्त्यावर आलेले फलकासह विविध प्रकारच्या वस्तू संबंधित मालकांनी काढून पालिकेला प्रतिसाद देऊन प्रशासनाचे कौतुक केले. नगरपालिकेने 80 जणांना आठ दिवसांची मुदत देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे.
भोर नगरपालिकेने 1 डिसेंबरपासून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत नगरपालिकेने 129 जणांवर कारवाई करून अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. परंतु गुरुवार ( दि.7) ज्यांनी अतिक्रमण काढले नव्हते. त्यांच्यावर सकाळपासूनच कारवाई करण्यास सुरुवात केली असताना दुकानाचे बोर्ड, पत्र्याची शेड, पायऱ्या अशा काढून घेण्यासाठी नगरपालिकेने 80 जणांना आठ दिवसांची मुदत देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले.
दिवसभर अतिक्रमण काढत असताना व्यापारीधारकमालकांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण मोहिमेस प्रतिसाद देत स्वतः असणारी अतिक्रमणे बाजूला करून दुकानासमोरील जागा मोकळी केली. यामुळे वाहतुकीस होणार अडथळा कमी झाला आहे. मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरअभियंता अभिजीत सोनावले, पवन भागणे, महेंद्र बांदल, महादेव बोडके, ज्ञानेश्वर मोहिते, अर्चना पवार, दिलीप भारंबे, अमोल मळेकर, राजेद्र राऊत, दत्तात्रय जगताप, स्वाती होले, संगिता रा बोराडे, स्मिता गोडबोले आदींनी कारवाई केली. यावेळी ट्रॅक्टर, जेसीबी, 30 कर्मचाऱ्यांनी सकाळीपासून अतिक्रमण काढण्यास कारवाई सुरू केली होती.
स्पर्धेतून अतिक्रमणाला चालना
व्यापारी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एकमेकांच्या स्पर्धेमुळे अतिक्रमण वाढण्याचे प्रमाण वाढत होत असल्यामुळे याचा परिणाम वाहतुक कोंडीवर होत असल्यामुळे पेठेत सतत वाहतूक कोंडी नित्यची ठरते. तरी व्यापाऱ्यांनी आपला माल आपल्या दुकानातच लावून अतिक्रमण करू नये, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून उमटत आहे.
बँकांनी पार्किंगची सोय करावी- मुख्याधिकारी
भोर शहरात एस. बी. आय बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पीडीसीसी बँक, आयडीबीआय बँक या बँकांचे व्यवहार हे खासगी जागेत असून बँकांकडून संबंधित मालक भाडे वसूल करीत आहे. परंतु बँकेकडे खातेदारांना गाडी पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे खातेदार रस्त्याच्या कडेलाच वाहने लावत असून यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्यामुळे बँकांनी खातेदारांसाठी पार्किंगची सोय करावी, असे मुख्याधिकारी हेमंत किरुळेकर यांनी सांगितले.