आळंदी ( एम.डी. पाखरे )
ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी ॥1॥
दशमीच्या दिवशीं महोत्सव अलंकापुरीं । करितसे हरि आवडीनें ॥
हरिदिन जागरण होत सारी रात्र । बसोनि पंढरीनाथ स्वअंगे ॥
द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा । पांच दिवस सारा महोत्सव ॥
अमावस्ये दिवशीं केला गोपाळकाला । मग वैष्णवाला लाभ मोठा ॥
नामा म्हणे देवा आनंद अलंकापुरी । कांही दिवस हरि राहा येथें ॥
श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचे समकालीन संत नामदेव महाराज यांच्या अभंगप्रमाणे माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी देव, संत, महात्मे उपस्थित होते. त्याचप्रमाणे आज (दि. 8) अलंकापुरीत विविध ठिकाणाहून लाखो वारकरी भाविक दाखल झाले आहेत. गेली चार दिवसांपासून दररोज हजारो भाविकांचे आळंदीत आगमन होत आहे. यावर्षी स्मार्त एकादशी (दि. 8) आणि भागवत एकादशी (दि.9) लागोपाठ आल्या आहेत. मात्र वारकरी संप्रदायात भागवत एकादशी कार्तिकी एकादशी यात्रा उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. पंचक्रोशीत भजन, कीर्तन आदी वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम सुरु आहेत. सर्वत्र हरीनामाचा गजर होत असून भक्तीमय वातावरण आहे. माऊली मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार परिसर, इंद्रायणी घाट परिसरात भाविकांची अलोट गर्दी आहे. समाधी दर्शन रांग इंद्रायणी घाटापलीकडील दर्शन मंडपात गेली असून दर्शनासाठी सहा तासांहून अधिक वेळ लागत असल्याचे भाविकांनी सांगितले.
प्रदक्षिणा रस्त्यावर अलोट गर्दी
वारकर्यांच्या दिंड्या सातत्याने आळंदीत दाखल होत आहेत. आळंदीत येताच वारकरी नगर प्रदक्षिणा करून आपल्या मुक्कामी विसावत होते. त्यामुळे प्रदक्षिणा रस्त्यावर वारकर्यांच्या दिंड्या आणि इतर भाविकांची वर्दळ यामुळे प्रदक्षिणा रस्त्यावर सकाळी संध्याकाळी अलोट गर्दी होती. यासह गोपाळपुरा, वडगाव रोड, मरकळ रोड, देहूफाटा, मोशी रोड आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच लाखो भाविक हे आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत आळंदीत पोहोचणार आहेत. उद्या (दि. 9) आळंदीत पाच लाखांपेक्षा जास्त भाविक जमण्याची शक्यता आहे.
माऊली मंदिरात सजावटीची लगबग
उद्या शनिवारी (दि.9) कार्तिकी एकादशी आळंदीची मुख्य यात्रा आणि सोमवारी (दि.11) होणार्या माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली जात आहे. रंगीबेरंगी फुलांच्या साह्याने माऊलींची, विठ्ठल रुख्मिणीची प्रतिमा साकारण्यात आली आहे. त्या सजावटीच्या कामाची माऊली मंदिरात लगबग सुरु होती.
आज माऊली मंदिरात होणारे कार्यक्रम
कार्तिक वद्य द्वादशी, भागवत एकादशी (कार्तिकी एकादशी यात्रा) शनिवार दिनांक 9 रोजी रात्री 12:30 ते पहाटे 2 11 ब्रम्हवृंदांच्या वेद घोषात पवमान अभिषेक व दुधारती, दुपारी 12 ते 12:30 महानैवेद्य, दुपारी 1 वाजता श्रींची नगर प्रदक्षिणा, रात्री 8:30 धुपारती, रात्री 12 ते 2 श्री मोझे यांचेतर्फे जागर.