कडूस : येथील प्रगतशील शेतकरी कैलास गेणभाऊ कालेकर यांच्या मालकीच्या शेतातील उसाला अचानक आग लागल्याने पूर्ण वाढ होत असलेल्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
कडूस नजिकच्या धामणमाळ येथील कैलास कालेकर यांच्या उसाच्या फडातून रविवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे धुराचे लोट दिसू लागले. कालेकर कुटुंबीयांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी कालेकर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनीही आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही यश आले नाही. वाऱ्याच्या झोताने आग पसरू लागली.
आग लागलेल्या कालेकरांच्या उसाच्या शेतातून महावितरणच्या विद्युत वाहक तारा गेल्याने, त्यांच्या घर्षणामुळे ठिणगी पडल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रसंगी उपस्थित कडूसचे सरपंच शहनाज तुरूक, उद्योजक अभिजित शेंडे, प्रकाश बोऱ्हाडे, बाळासाहेब धायबर, सागर जाधव यांनी आकस्मिक नैसर्गिक कारणांमुळे झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा करून, नुकसान झालेल्या शेतकऱ्याला भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.