नगर – तपोवन रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपामागे भिस्तबाग सर्व्हे नंबर 10/5 या रेखांकनातील खुली जागा परस्पर मोबाईल कंपनीला जागा भाडेतत्वावर देऊन त्या जागेत मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेने या प्रकरणी राहुल मच्छिंद्र कजबे व इतर आठ जणांना नोटीस बजावली असून सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जागेत उभारलेले मोबाईल टॉवर येत्या सात दिवसात काढून घेण्याचे आदेश देऊन टॉवर न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या सावेडी प्रभाग कार्यालयाच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहे. भिस्तबाग येथील शिवाजी उत्तम बोठे यांनी तपोवन रोडवर नायरा पेट्रोल पंपामागे भिस्तबाग सर्व्हे नंबर 10/5 या जागेत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू असून, या टॉवर रेडिएशनमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हे काम तत्काळ थांबवावे, अशी मागणी केली होती. तक्रारीनुसार सावेडी प्रभाग कार्यालयाने समक्ष स्थळ पाहणी केली असता, त्या जागेत इंडस कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याचे दिसून आले.
त्यानंतर सावेडी प्रभाग कार्यालयाने नगररचना विभागाकडून अभिप्राय मागविला. भिस्तबाग सर्व्हे नंबर 10/5 या रेखांकनास अंतिम मंजूरी देण्यात आलेली आहे. या रेखांकनात 642.541 चौरस मीटर हिस्सा नंबर 16 ही खुली जागा सोडण्यात आलेली आहे. सदर जागा ही रेखांकनातील भूखंडधारकांसाठी सार्वजनिक वापरासाठीची आहे.
या जागेची विक्री अथवा ती भाडेतत्वावर देता येत नाही, असे नगररचना विभागाने स्पष्ट केले. त्याउपरही मोबाईल टॉवर उभारण्याकरीता ही खुली जागा भाडेतत्वावर देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे मोबाईल टॉवर या जागेतून सात दिवसांच्या आत हटवावे. अन्यथा महापालिका अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. दरम्यान, इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीलाही महापालिकेने या नोटीसीची प्रत पाठवली आहे.