शिवाजीराव आढळराव पाटील : लांडेवाडीत कार्यकर्ता बैठक
मंचर – सध्याच्या काळात सोशल मीडिया हे जनतेपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाचे माध्यम असून प्रत्येक शिवसैनिकांने पक्षाने केलेली कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे, असा सल्ला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसैनिकांना दिला.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसैनिक व सोशल मीडिया प्रमुख कार्यकर्ता बैठक कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे , जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, रवींद्र करंजखिले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे ,
तालुका प्रमुख संतोष डोके, युवासेना अधिकारी प्रवीण थोरात पाटील, शिवाजी राजगुरू, युवसेना राष्ट्रीय सरचिटणीस सचिन बांगर , अशोक मोढवे , शशिकांत बाणखेले आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, सोशल मीडियावर काम करताना प्रत्येक शिवसैनिकाने ऍक्टिव्ह राहून काम केले पाहिजे.
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इतर सोशल मीडियावर आपले खाते खोलून त्याचा वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येक शिवसैनिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पक्षाची कामे जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.
यावेळी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आपण सगळे कामाला लागलो असून, शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हेच खासदार म्हणून निवडून येणार असून, आपण सर्व शिवसैनिकांनी तन-मन धनाने काम करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार शरद सोनवणे आणि सोशल मीडिया टीम समन्वयक सुमित शेलार याची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र करंजखिले, आभार वैभव पोखरकर यांनी मानले.