पुसेगाव – जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सातारा शाखेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा सातारा पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष के. आर. फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जिल्ह्यातील जिल्हा परिषद अभियंता व स्थापत्य अभियंत्यांच्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अभियंत्यांना नाहक त्रास देणाऱ्या समाजकंटक, बोगस संघटना व त्यांचे पदाधिकारी यांच्या विरोधात संघटना तीव्र आंदोलन करेल, असा ठराव घेण्यात आला. जिल्हा परिषद अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शासनाकडून मिळवून दिल्याबद्दल राज्य संघटनेचे अध्यक्ष सुहास धारासुरकर व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. तसेच सभासदांच्या जिल्हा परिषद आस्थापना विषयक प्रलंबित मागण्याचा संघटनेने पाठपुरावा करावा असे ठरले.
या सभेस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबासाहेब कुंभार, सचिव महेश टिकोले, कोषाध्यक्ष विजय खामकर, उपाध्यक्ष रेखा महतो, सुहास माने, जिल्हा संघटक काडगेवार, अशोक काळे, माजी सचिव संदीप पाटील, सर्व तालुक्यांचे तालुका पदाधिकारी व सर्व अभियंता उपस्थित होते.