बारामती ऍकॅडमीच्या दोन खेळांडूची प्रो कबड्डी लीगमध्ये निवड : बंगालसाठी 9 लाखांची बोली
बारामती – बारामती येथील दोन राष्ट्रीय कबड्डीपटूंची प्रो कबड्डी लीग पर्व 10 साठी बंगाल संघातून निवड झाली आहे. दोन्ही खेळाडूंसाठी 9 लाख 63 हजारांची बोली लागली होती. दोन्ही खेळाडूंचा करार दोन वर्षांसाठी झाला आहे. दोन डिसेंबरपासून प्रो कबड्डी लीगच्या स्पर्धा सुरू होणार आहेत. बारामती जिल्हा क्रीडा संकुलामुळे बारामती येथे कबड्डी खेळाकडे युवकांचा कल वाढू लागला आहे.
दीपक शिंदे व श्रेयस उमरदंड अशी या दोन खेळाडूंची नावे आहेत. बिटरगाव (जि. सोलापूर) येथील मूळ रहिवासी असणारा दीपक शिंदे (वय 19) हा कुटुंबाचा विरोध पत्करून केवळ कबड्डीसाठी मागील पाच वर्षांपासून बारामतीमध्ये राहत आहे. बारामती स्पोर्ट ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षक दादा आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे.
दीपकने दोन वर्षातच राज्याच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले होते. दीपक याची बंगालच्या संघामध्ये डिफेंडर म्हणून निवड झाली आहे. तत्पूर्वी कबड्डी या खेळाच्या वेडापायी दीपक यांच्या कुटुंबाकडून त्याला मोठा विरोध झाला. दीपक याचे एकत्र कुटुंब आहे. त्याने पोलीस भरती व्हावे, अशी कुटुंबाची अपेक्षा होती. एकदा का मी या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवले तर आपोआप त्यांचा विरोध मावळेल, असेही दीपक म्हणतो.
उमरदंड याची बंगाल संघामध्ये लेफ्ट कव्हर डिपेंडर म्हणून निवड झाली आहे. श्रेयस याच्या वडिलांचे बारामतीत किराणा मालाचे दुकान आहे. तो सध्या टीसी महाविद्यालयामध्ये बीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
बारामती येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार व्हावेत. असा आमचा उद्देश आहे. दीपक व श्रेयसने घेतलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले आहे. आज अनेक खेळाडू कबड्डी खेळाकडे आकर्षित होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. भविष्यात इतर खेळांप्रमाणे कबड्डीचे देखील व्यावसायिक खेळाडू तयार होतील.
– दादा आव्हाड, प्रशिक्षक