शिर्डी – महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले गेले. राज्यातील एक वरिष्ठ नेते केंद्रात कृषिमंत्री राहिले. व्यक्तिगत मी त्यांचा सन्मान करतो; पण त्यांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? अशा शब्दांत शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) शिर्डीत त्यांच्यावर हल्लाबोल केला.
शिर्डी येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मोदींच्या हस्ते नगर जिल्ह्यासह राज्यातील 7 हजार 500 कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. या मेळाव्याला राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते कृषिमंत्री असताना 7 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ देशातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांचे हमीभावावर अन्नधान्य खरेदी केले. परंतु इतक्याच कालावधीत आमच्या सरकारने हमीभावाने साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. सन 2014च्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची 500 ते 600 कोटी रुपयांची हमीभाव केंद्रावर खरेदी व्हायची. आमच्या सरकारने 1 लाख 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ते कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांच्या पैशांसाठी दलालांच्या भरवशावर राहायला लागायचे.
महिनो-महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने हमीभावचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायची योजना आणली. रब्बी पिकांसाठी हमीभावाची घोषणा केल्याने त्याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मागील 9 वर्षांत 70 हजार कोटींचे इथेनॉल खरेदी केले. ऊसउत्पादकांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी कारखान्यांना मदत केली, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना आणली त्याचा आनंद आहे.
इथल्या शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळतील, असे मोदी म्हणाले. शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तडफडत ठेवले. सन 1970मध्ये निळवंडे प्रकल्पाला मान्यता मिळाली. हा प्रकल्प पूर्ण होण्यास 5 दशके लागली. आमचे सरकार आल्यावर योजनेला गती मिळाली आणि आता लोकांना कालव्यातून पाणी मिळत आहे. बळिराजा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पाणी परमात्म्याचा प्रसाद आहे. एक थेंबही पाणी वाया घालवू नका, ही शेतकऱ्यांना विनंती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची बचत करा, असे आवाहन मोदी यांनी केले.
विकसित देशाचा संकल्प करू या!
महाराष्ट्रात अपार सामर्थ्य आहे. जितका जलद महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच भारताचा विकास होईल. महाराष्ट्रात रेल्वे विस्ताराचा सिलसिला सातत्याने सुरू आहे. सन 2047मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, तेव्हा जगात भारताचे नाव विकसित देशांमध्ये होईल हा संकल्प करू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.