जुन्नर तालुक्यात वेचणी सुरू : पावसाच्या दडीमुळे फुलांची गळती
भाव कमी असल्यामुळे उत्पादन खर्चही निघे ना
रामदास सांगळे
बेल्हे – बहुदा विदर्भ व मराठवाड्यात घेतले जाणारे पीक ज्याची ओळख “पांढर सोन’ अशी आहे म्हणजेच कापूस. हेच पांढऱ्या सोन्याची जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील साकोरी, मंगरूळ, पारगाव, झापवाडी, बेल्हे, बोरी या पिकाची काही शेतकऱ्यांना लागवड केली आहे. सध्या कापसाची वेचणी सुरू आहे. दरम्यान, यंदा कापसाला फूल येण्याच्या वेळेला पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांची गळती झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
जुन्नर तालुक्याचे वातावरण या पिकासाठी योग्य आहे; परंतु पावसाअभावी यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. इतर पिकांपेक्षा कमी मशागत करावी लागते. आवश्यकतेनुसार तीन ते चार वेळा फवारणी केली जाते. तरकारी पिकांना शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते. तरकारी पिकाला भाव कधी कमी तर कधी जास्त मिळतो. भाव कमी मिळाला की शेतकऱ्याला नुकसानीला सामोर जावे लागले.
भाव कमी असल्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही. फवारणी, वेचणी मजुरीचा खर्च मोठा असतो.
शेतमजूर कापूस वेचण्यासाठी मिळत नाहीत. कापसाचे पीक शेतकऱ्यांचे शक्यतो नुकसान करणार पीक नाही. तसेच कापूस विकण्यासाठी साकोरीत येथे बाजारपेठ आहेत. साकोरी गावातील काही शेतकरी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कापसाचे पीक आपल्या शेतात घेत आहेत. कापूस काढल्यानंतर शेतात दुसरे पीक ही घेता येते. मागील आठवड्यात 68 ते 70 तर तीन दिवसांपूर्वी 64 ते 68 तर सध्या 70 ते 72 रुपये किलोला बाजरभाव मिळत आहे.
पावसाअभावी उत्पादनामध्ये घट झाली आहे, त्यात यंदा कापसाला बाजार भाव कमी असल्यामुळे उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. किमान 10 हजार रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा आहे.
– दत्तात्रय विश्वासराव, कापूस उत्पादक शेतकरी, साकोरी