रांजणगाव पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रांजणगाव गणपती – कारेगाव (ता. शिरुर) येथील फिनिक्स सिटीच्या प्लॉटिंगमधील ऑफिसचे शेडमध्ये प्लॉटिंगमध्येच झालेल्या तरूणाच्या मृत्यूप्रकरणाचा तपास घात झाल्याचे निष्पन्न झाल्याने रांजणगाव पोलिसांनी आरोपीला पुणे हडपसर येथून ताब्यात घेतले.
कारेगाव येथे विठ्ठल केशव शेळके (वय 35, रा. मुंडेकरवाडी, जि. नगर) याचा मृतदेह (दि.5) आढळला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. मात्र, पोलिसांना शवविच्छेदन अहवालात डोक्यामध्ये अंतर्गत जखमा होऊन मृत्यू झाल्याचे समजताच तपासाची सूत्रे फिरली. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांना शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तरूणाचा मृत्यू हा डोक्यात अंतर्गत जखमा होऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन झाल्याचे सांगताच रोकडे यांनी तपासाची चक्रे गतीमान केली.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन तसेच साक्षीदारांकडे तपास केला. तरूणाचा मृत्यू झालेल्या ठिकाणी एक सिमेंटचा मोठा ठोकळा, त्यास रक्ताचे डाग होते. साक्षीदारांकडे तपास केला असता मृत्यू झालेल्या तरूणासोबत याठिकाणी झोपण्यासाठी पोपट बाळासाहेब गाडेकर व वामन बबन चौघुले (रा. जवळा, जि. नगर), असे दोघेजण होते. विठ्ठल शेळके व वामन चौघुले यांच्यात झोपण्याच्या कारणावरुन दारु पिऊन वाद झाला होता.
त्यातून चौघुले याने विठ्ठल शेळके याच्या डोक्यात सिमेंटचा ठोकळा टाकून खून केला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी (दि.12) खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.