जुन्नर : मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करून समाज बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी बापू भुजबळ यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जुन्नर सकल मराठा समाजाच्या वतीने जुन्नर पोलीस प्रशासनकडे करण्यात आली आहे.
सकल मराठा समाज, जुन्नरचे गणेश महाबरे, सुनील ढोबळे, संजय खंडागळे, संदेश बारवे, नरेंद्र कासार, रुपेश जगताप आदींनी समाज बांधवांच्या वतीने लेखी निवेदन पोलीस प्रशासनाला सादर केले. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, मराठा आरक्षणाबाबत राज्यभर आंदोलने सुरू असून त्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करित आहेत.
हे आंदोलन सुरू असताना ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे बापू भुजबळ हे सोशल मीडियावर मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार घाणेरड्या भाषेत पोस्ट करीत आहेत. यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून भावना दुखावल्या गेल्या आहेत.
समाज बांधवांच्या वतीने भुजबळ यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून बापू भुजबळ यांनी मराठा समाजाची माफी मागावी, तसेच पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर याबाबतची योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.