पुणे – पुणे बार असोसिएशनच्या निवडणुका मतदानाच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचा समर्थकांकडून जोमाने सुरू असलेल्या प्रचाराला ब्रेक बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांसह असोसिएशनने केलेल्या नियोजनशून्य कारभारामुळे वेळेसह पैशांचाही अपव्यय होत आहे. मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे उमेदवारांकडून खासगीमध्ये सांगण्यात येत आहे.
पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक ३१ जानेवारी रोजी होणार होती. मात्र, मतदार यादीतील त्रुटीवर वकील वर्गाकडून आक्षेप घेतल्याने मतदानाची तारीख १६ फेब्रुवारी रोजी ठरविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकार्यांना विरोध करून काही साध्य होणार नाही, हे जाणून उमेदवारांनीही त्यास अनुमती दिली. मात्र, मागील १५ दिवसांपासून प्रचार करणार्या उमेद्वारांना आत्ता पुढील आणखी काही दिवस प्रचार करावा लागणार आहे.
यामध्ये उमेदवारांना प्रचार साहित्यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. यापूर्वीच खर्च झालेला असताना आणखी खर्च करावा लागणार असल्याने पुढच्या काळात प्रचार करायचा, की थांबवायचा? असा विचार उमेदवारांडून होऊ लागला आहे. निवडणुकांबाबत अधिकृत माहिती तसेच पुढील नियोजनाबबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर न केल्याने निवडणुका नक्की कोणत्या दिवशी होणार, यावरून उमेदवारांसह वकीलवर्ग संभ्रमात आहेत.
उमेदवार म्हणतात…
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच उमेदवारांकडून मित्र, सहकारी तसेच वरिष्ठांकडून जोरदार प्रचार करण्यात येत होता. निवडणुकीची मुदत वाढविल्याने ते पुन्हा येतील की नाही याची शाश्वती नाही. तसेच, काम सोडून त्यांना प्रचारासाठी कसे बोलवायचे असाही प्रश्न भेडसावत असल्याचे उमेद्वारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.