*अपघातात इको कार चा चक्काचुर
* एसटी बस मधील प्रवाशी सुखरूप
बेल्हे – नगर-कल्याण महामार्गावर राजुरी (ता.जुन्नर) शिवारात एसटी बस व कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन यात इको कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. ११) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. गुलशन शकील चौगुले (वय ४८, रा. राजुरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या पारनेर डेपोच्या एसटी (एम एच १४ बीटी ४२८०) बसला नगरकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली बसली. अपघात इतका भयानक होता की कारचा चक्काचुर झाला.
यामध्ये कारमधील महिला मृत झाली तर लहान मुलगा व चालक यासह दोन मुली असे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले आहे. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेच्या घेतली. बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते, बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.