वाल्हे – मांडकी येथे श्रीसंत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा वीर, लपतळवाडी गावांचे स्वागत स्वीकारत मांडकी (ता. पुरंदर) येथे दुसऱ्या दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोहळ्याचे शुक्रवार (दि.16) सायंकाळी सहाच्या दरम्यान ऊन- सावलीच्या खेळत आगमन झाले.
ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांच्या व फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. पारंपरिक ढोल-लेझीमच्या तालावर ग्रामस्थ व न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचा खेळ करीत सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रूक्मिणीची वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. सायंकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये पालखी विसावली. हजारो वैष्णवांच्या उपस्थित समाज आरती झाली. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी लपतळवाडी, मांडकी, जेऊर, वाल्हे, पिसुर्टी, हरणी परिसरातील भाविक आले होते.
यावेळी सोमेश्वरचे माजी संचालक मोहन जगताप, सरपंच प्रियांका शिंदे, उपसरपंच बाळासाहेब जगताप, माजी सरपंच सतीश जगताप, दशरथ जगताप, माजी उपसरपंच विश्वास जगताप, विजय सणस आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. यावेळी विश्वस्त त्रिगुण गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील प्रवीण जगताप, विजय साळुंके, सतीश जगताप, रामचंद्र जगताप, संजीवन जगताप, महेश साळुंके, राहुल जगताप, लखन साळुंखे, तेजपाल सणस, विशाल दुर्गाडे उपस्थित होते. दरम्यान, लपतळवाडी येथे सरपंच सुवर्णा कदम, उपसरपंच रवींद्र मोरे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुंडलिक कदम, सचिन शेटे, सुशील लोळे, महादेव पिलाणे आदी उपस्थित होते.