राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी घेतला आढावा
इंदापूर – संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर शहरात एकदिवसीय मुक्कामी येत असून, या सोहळ्याची तयारी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था येते. मुक्कामी व्यवस्था पहिल्यांदाच सर्व सुविधांयुक्त केलेली असून, पहिले मानाचे गोल रिंगण रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात रंगणार आहे.
रिंगण स्थळ व मुक्कामी ठिकाण याची पाहणी तसेच आढावा गुरुवारी (दि. 15) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी घेतला. इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, वसंतराव माळुंजकर, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गारटकर म्हणाले, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पहिल्यांदाच इंदापूर शहरातील नव्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पटांगणात विसावणार आहे. त्यामुळे रिंगण सोहळा व वारकऱ्यांना कोणत्याही सुविधा अपुऱ्या पडू नयेत. याची खबरदारी पुरेपूर घेण्यात आलेली आहे. मी नगराध्यक्ष असतानाच तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा इंदापुरात सुरू करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेची जुनी इमारत जीर्ण झालेली होती. ती संस्थेने पाडलेले आहे. त्यामुळे हजारो नागरिक व वारकऱ्यांना रिंगण सोहळा आनंदाने पाहण्यास मिळणार आहे.
‘हरित वारी’अंतर्गत तीनशे झाडांचे रोपण
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील स्वच्छता, दिवाबत्ती, पाणी तसेच पालखी रिंगणाच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना, तसेच मुक्कामाच्या ठिकाणची स्वच्छता, लाईट, स्नान व्यवस्था, तसेच पालखीसाठी लागणारी मंडप व्यवस्था, याचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. एक हजार मोबाईल टॉयलेट इंदापुरात असणार आहेत. शहरातील 11 ठिकाणी हे मोबाईल टॉयलेट ठेवण्यात येणार आहे.
75 कर्मचाऱ्यांची टीम पालखी सोहळ्यासाठी शहर चकाचक करत आहे. हरित वारी हा उपक्रम पुणे जिल्हाधिकारी व पालखी विश्वस्तांनी ठरवून केलेला आहे. त्यानुसार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यामार्फत, खड्डे खोदून, काळी माती भरून जवळपास 300 झाडांचे वृक्षारोपण पूर्ण केले आहे. यामध्ये पिंपळ, वट, लिंब, चिंच, या झाडांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशी माहिती यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दिली.