विक्री केल्याचे प्रकरण उजेडात आल्याने खळबळ
कापूरहोळ – भोर तालुक्यातील भोंगवली गावच्या हद्दीत असलेल्या देवस्थानच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, 7 सदस्य, विक्री करणारा व खरेदी घेणारे दोघेजण, अशा एकूण 13 जणांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विद्यमान ग्रामसेवक जकाप्पा सत्याप्पा बिराजदार (रा, शिरवळ ता. खंडाळा) यांनी फिर्याद दिली.
तत्कालीन ग्रामसेवक राहुल धोंडीबा शेलार, तत्कालीन सरपंच निलम संदीप उल्हाळकर, उपसरपंच लिला उत्तम बाठे, भगवान एकनाथ भांडे, जीवन हनुमंत निगडे, राजेंद्र विश्वास खोमणे, गणेश दत्तात्रय सुर्वे, मनीषा संतोष शेडगे, चांदणी शिवाजी लंके, इंदुबाई संपत लंके, जमिनीची विक्री करणारा संतोष अर्जुन नलावडे व जमीन खरेदी करणारे दीपक गुलचंद चव्हाण व नीता दीपक चव्हाण (सर्व रा. भोंगवली. ता. भोर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील स. नं. 432 या जमिनीची “श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, वहिवाट सरपंच’ अशी ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला नोंद आहे. दरम्यान, संतोष व ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी संगनमताने या जागेची बनावट कागदपत्रे व खोटे दाखले तयार केली. या जमिनीची विक्री संतोष नलावडे याने दीपक चव्हाण व नीता चव्हाण यांना केली. गावात चर्चा सुरू झाल्याने हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासकीय अधिकारी वर्गाने रेकॉर्डला असलेली कागदपत्रे व जमिनीचा व्यवहार करताना सादर केलेली कागदपत्रे जुळत नसल्याने 13 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.