बारामतीत दाम्पत्यावर गुन्हा दाखल : शहर पोलिसांची कारवाई
बारामती/ जळोची – एका दाम्पत्याने आपल्याकडे कामाला येत नसल्याच्या रागातून महिलेची अश्लिल फोटो तिच्या पतीसह नातेवाईकांना पाठवल्याची घटना घडली. संबंधित महिलेची बदनामी केल्याप्रकरणी देवीलाल पेमाराम कुमावत व पायल देविलाल कुमावत या पती-पत्नीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित 24 वर्षीय मजूर महिलेने फिर्याद दिली आहे.
फिऱ्यादीनुसार, जून 2021 पासून पीडित महिला व तिचा पती हे देवीलाल यांच्याकडे बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. तिचा पती फरशी बसविण्याचे काम करीत होता. दरम्यानच्या काळात देवीलाल याच्याशी तिचे सूत जुळले. ती त्याच्याशी चॅटींग करू लागली. अनेकदा त्यांच्यात व्हिडीओ कॉल होऊ लागले. व्हिडीओ कॉलवेळी देवीलाल याने तिचे नको, त्या अवस्थेतील फोटोंचे स्क्रीन शॉट काढून घेतले. चार महिने त्यांच्यात हा प्रकार सुरु होता.
दरम्यान, महिलेने त्याच्याकडे कामाला जाणे बंद केले. त्यानंतर देवीलाल व त्याच्या पत्नीने तुम्ही आमच्याकडेच कामाला यायचे असे म्हणत तिला धमकी दिली. मात्र, पीडित महिलेने नकार दिल्यावर या दोघांनी तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तरीही ती त्याच्याकडे कामाला गेली नाही. त्या रागातून या दोघांनी तिच्या पतीसह अन्य नातेवाईकांच्या व्हॉटसअपवर हे फोटो पाठवत तिची बदनामी केली.
दोघांविरोधात पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.