पळसदेव – पावसाळा सुरु होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील राज्यासह पळसदेव भागात समाधानकारक पाऊस झाला नव्हता; मात्र गणपती बाप्पा पावले आणि मागील चार पाच दिवसांत राज्यात विविध भागासह पळसदेव भागात समाधानकारक पाऊस बरसला. यामुळे बळीराजासह उद्योजकांची पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली; मात्र अचानक बरसलेल्या पावसाने हवामानात बदल झाला आणि पळसदेव भागातील दवाखाने फुल्ल झाले. असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पळसदेव भागातील शासकीय दवाखान्या पेक्षा खाजगी दवाखाने रुग्णांनी अगदी फुल्ल भरून गेले. अगदी रात्री दहा वाजेपर्यंत दवाखाने सुरू असल्याचं चित्र पळसदेव गावात पाहावयास मिळत आहे. व्हायरल इन्फेक्शन मुळे थंडी, ताप, अंग दुखी, पेशी कमी होणे, पेशी वाढणे याचे शेकडो रुग्ण गावात पाहावयास मिळत आहे.
गावात डेंग्यू, गोचीड ताप सदृश लक्षणे असलेली अनेक रुग्ण पाहावयास मिळत आहेत. पाऊस झाल्याने अनेक भागात डबकी साचली आहेत. त्यात रस्त्याचे व जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकामामुळे जुनी पाइपलाइन फुटली आहे. याचे पाणी जाऊन अनेक ठिकाणी पाणी साठत आहे. अनेक ठिकाणी डबकी झाली आहे. त्यामुळे मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे.
अनेकांना सलग तीन चार दिवस ताप येणं अशी लक्षण आलस्यामुळे रक्त तपासणी व रूग्णालयात ऍडमीट झाल्यावर सलाइन यांसाठी हजारो रुपयाचा खर्च होत आहे. त्यामुळे ऐन पितृ पंधरवड्यात नागरिकांच्या खिशाला चाट बसत आहे. नागरिक शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
अद्याप तरी आमच्याकडे डेंग्यूचा रुग्ण सापडला नाही; मात्र नागरिकांची थंडी, ताप अशी लक्षणे असल्यास तात्काळ रुग्णालयात येऊन उपचार करून घ्यावेत. शिवाय आम्ही सर्व आशा सेविकांना संपूर्ण गावात सर्वे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डेंग्यू सदृश लक्षण असलेल्या नागरिकांची माहिती जमा करून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येतील.
-ईशा बंगेरा, वैद्यकीय अधिकारी