प्रा. जनार्दन लांडे पाटील
शेवगाव – तालुक्यातील बोधेगाव, बालमटाकळी, आव्हाने बुद्रुक, लाडगाव जळगाव, मुंगी आदी मोठ्या 27 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ऐन दिवाळीत त्या गावचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असून, या निमित्ताने ग्रामीण भागाचे राजकारण ढवळून निघणार आहे.
राज्य सरकारच्या 15व्या वित्त आयोगाचा विकास निधी सध्या थेट गावच्या ग्रामपंचायतीकडे येत असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने गावातील युवकांचा गावकीच्या निवडणुकीत सहभाग वाढत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा तालुक्याच्या राजकारणावर थेट परिणाम होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष या निवडणुकीवर असते, म्हणून सरपंचपदासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी प्रभावी लोकसंपर्क असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा शोध घेऊन तगड्या मंडळाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा, बैठकांच्या माध्यमातून निवडणुका होणाऱ्या गावाचे राजकारण ढवळून निघत आहे.
या निवडणुकीसाठी 27 ग्रामपंचायतींच्या 94 प्रभागांत 220 जागांसाठी मतदान होणार असून, 29 हजार 665 पुरुष, 26 हजार 666 महिला मिळून एकूण मतदारांची संख्या 56 हजार 331 आहे. या निवडणुकीसाठी दि. 16 ते 20 उमेदवारी अर्ज दाखल करणे. दि. 23 छाननी, दि. 25 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, दि. 5 नोव्हेंबरला मतदान, तर दि. 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या गावात बैठकांना जोर आला आहे.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती व तेथील सरपंचाचे आरक्षण पुढीलप्रमाणे –
आव्हाणे बुद्रुक (अनुसूचित जाती), लाखेफळ (अनुसूचित जाती महिला), बऱ्हाणपूर, लोळेगाव, वडुले बुद्रुक, थाटे, मुंगी, भगूर, गोळेगाव, खडके, वडुले खुर्द व एरंडगाव समसूद (सर्वसाधारण महिला), सामनगाव, लाडजळगाव, वरुर बुद्रुक, मडके, हिंगणगावने, दोरसडे/आंत्रे, देवटाकळी व खरडगाव (सर्वसाधारण), भागवत एरंडगाव, दिवटे, बालमटाकळी, बोधेगाव, कऱ्हेटाकळी व शेकटे खुर्द (नागरिकांचा मागास प्रवर्ग). या शिवाय जुनी खाम पिंपरी, दहिगाव-शे व रावतळे/कुरुडगाव या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेची पोटनिवडणूक याचवेळी होणार आहे.