तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे : कार्यकर्ते मात्र संभ्रमात
पिरंगुट – मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकसंध आहेत. आम्ही सर्व जण राष्ट्रवादी कॉंग्रेस, पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी सभापती महादेव कोंढरे यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेसोबत जाऊन नुकतेच उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले. मात्र आता पक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झालेले असून मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारा तालुका अशी ओळख आहे. बारामती लोकसभा मतदार संघ आणि भोर विधानसभेला मुळशी तालुक्याचा समावेश होतो.
मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्षपद सुनिल चांदेरे यांच्याकडे तर जिल्हा दूध संघावर कालिदास गोपालघरे आणि चंद्रकांत भिंगारे हे प्रतिनिधित्व करत आहे. तर संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा नियोजन समिती याठिकाणी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते निवडून आलेले होते.
जिल्हा परिषदेच्या तीन पैकी दोन जागा व पंचायत समितीच्या सहा पैकी चार जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिंकलेल्या होत्या. त्याचबरोबर अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, विविध विकास कार्यकारी सोसायट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुळशी तालुक्यात निर्विवाद वर्चस्व आहे.
दोन्ही नेत्यांना मानणारा वर्ग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशी तालुक्यात दिलेली विविध पदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदार संघात फिरून बांधलेली संघटना व केलेली विकासकामे मोठ्या प्रमाणावर आहेत. मुळशी तालुक्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व या दोन्ही नेत्यांना मानणारा वर्ग मोठा असून पडलेल्या दोन गटामुळे मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.