इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता न आल्याने नाराजी
आंबेगाव तालुक्यात मतदार यादीत गोंधळ
याद्या त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी वाढली
मंचर – आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मूळ वास्तव्य असलेल्या गावातील, वस्तीवरील आणि वॉर्डातील अनेक मतदारांचे नावे शेजारच्या गावातील मतदार यादीत गेल्याचे प्रकार घडल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता आला नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत घोडेगाव तहसील निवडणूक अधिकारऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन मतदार याद्या दुरुस्त कराव्या, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख कलावती पोटकुले यांनी केली आहे.
30 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून 13 ग्रामपंचायतीची काही सदस्य पद रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. मतदार यादी जाहीर झाल्या असून, अनेक मतदार यादीत घोळ झाले आहेत. आदिवासी भागात असलेल्या जांभोरी, साकेरी, पालखेवाडी, तळेघर येथे अनेक मतदारांची नावे दुसऱ्या गावातील मतदार यादीत गेल्याचे प्रकार घडले आहेत.
याबाबत अनेक मतदार नागरिक घोडेगाव तहसील कार्यालय येथे यादी दुरुस्तीसाठी हेलपाटे मारत असून ग्रामपंचायत निवडणूक विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. केवळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने मतदार याद्या तात्काळ दुरुस्त कराव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा कलावती पोटकुले यांनी दिला आहे.
सर्वसामान्यांनी निवडणूक लढवायची नाही का?
साकेरीची निवडणूक लागली असून साकेरी गावातील रहिवासी असलेले गोविंद गंगाराम मोहंडूळे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांचे नाव तळेकर येथील ग्रामपंचायत यादीत गेल्याने त्यांना अर्ज भरता येत नसल्याने त्यांनी 2017-18 च्या निवडणूक यादीप्रमाणे साकेरीतून निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी याबाबत विनंती अर्ज निवडणूक अधिकारी घोडेगाव येथे दिला आहे. नागरिकांनी निवडणूक लढवून नये यासाठी आहे का, असा प्रश्न पोटकुले यांनी उपस्थित केला असुन निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
निवडणूक प्रारूप याद्या प्रसिद्ध केली होती आणि त्या गावोगाव लावल्या होत्या. त्यावेळी संबंधित मतदारांनी नावे तपासणे गरजेचे होते. भविष्यात पुढील निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये काही दुरुस्ती असेल तर ती आवर्जून करून सहकार्य केले जाईल.
– ए. बी. गवारी, निवडणूक निर्णय अधिकारी, आंबेगाव तालुका