* सहकारातील सोसायटीच्या निवडणुकीने राजकारण ढवळले
* यात्रा-जत्रांमध्येही पुढाऱ्यांची हजेरी
* नजरा गट-गणाच्या आरक्षणाकडे
संतोष वळसे पाटील
मंचर – आंबेगाव तालुक्यात सहकार सोसायटीच्या निवडणुकीने राजकारण ढवळून निघाले आहे. गावागावांत गटातटाच्या राजकारणाने भाऊबंदकीत राजकारणाचा पारा चढला असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने आता नजरा गट-गणाच्या आरक्षणाकडे आहेत. यामुळे गाव यात्रांमध्येही आता राजकीय पुढारी हजेरी लावून निवडणूक आल्याची चाहुल देऊ लागले आहे.
गावपातळीवर आर्थिक कणा मानल्या गेलेल्या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीपिकांसाठी कर्ज दिले जाते.ग्रामपंचायतीच्या आणि सोसायटीच्या निवडणुका महत्त्वाच्या असतात, त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपने आपले लक्ष या निवडणुकीत केंद्रित केले आहे. सहकारात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून, तर गावपातळीवरील पतसंस्था, ग्रामपंचायत आणि सोसायटीवर वर्चस्व आहे. तालुक्यात 59 सोसायट्या आहेत. करोनामुळे सुमारे एक ते दीड वर्ष येथे मुदतवाढ दिली होती. आता सर्वच सोसायट्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज माघारीपर्यंत काही सोसायटींची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
तालुक्यात सध्या ग्रामदेवतांच्या यात्रांचा जोर वाढला आहे, त्यामुळे राजकीय पुढारी आपआपल्या पद्धतीने राजकीय प्रदर्शन करीत आहेत. सोसायटी निवडणूक म्हणजे गावाची मिनी विधानसभाच असते. सोसायटीमधून एकजण जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदान करतो. त्या प्रतिनिधीला विशेष महत्व असते. यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे नेते संजय थोरात, जयसिंगराव एंरडे, डॉ. ताराचंद कराळे, कॉंग्रेसचे राजू इनामदार आदी नेते गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकीकडे कार्यकर्त्यांमार्फत विशेष लक्ष देत आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे विवेक वळसे पाटील, रुपाली जगदाळे, अरुणा थोरात, तुलसी भोर आणि शिवसेनेकडून देविदास दरेकर निवडून आले. पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य म्हणून संजय गवारी, संतोष भोर, उषा कानडे, आशा शेंगाळे, नंदकुमार सोनावले, इंदुबाई लोहोकरे, शिवसेनेचे शितल तोडकर, रवींद्र करंजखेले, अलका घोडेगाव, अपक्ष म्हणून राजाराम बाणखेले निवडून आले. मंचर नगरपंचायत झाल्यामुळे येथील काही इच्छुकांचा हिरमोड झाला; परंतु नगरपंचायत निवडणुकीसाठी ताकदीने निवडून यायचे असे स्वप्न अनेक इच्छुकांनी बाळगले आहे.
महाविकास आघाडीची शक्यता कमी
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीची शक्यता कमी आहे, जर महाविकास आघाडी वरिष्ठ नेत्यांनी लादली तर स्थानिक कार्यकर्ते महाविकास आघाडीचे काम मनापासून करतील का याबाबत साशंकता आहे. मंचर ग्रामपंचायत निवडणुकीवेळी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला; परंतु निवडुन आलेले सदस्य फारशी कामे न झाल्याने नाराज आहेत. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सदस्यांची हमरीतुमरी झाली. मंचरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना पक्षामध्ये ताळमेळ नाही. गटबाजी आहे, त्यामुळे सर्वच अलबेल आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.