शहाराला पाणीपुरवठा होणार : नाझरेतील पाणीसाठा संपुष्टात
पंपहाऊसमधील वीजजोड पूर्ववत करण्याची सूचना
जवळार्जुन – नाझरे धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने जेजुरी शहरात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. जेजुरी शहराला पर्यायी मांडकीडोह योजनेतून पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन या योजनेतील पंपहाऊसमधील वीजजोड पूर्ववत करण्याची सूचना दिल्याने हे काम युद्धपातळीवर सुरू होणार असल्याचे जेजुरी भाजपाचे सचिन पेशवे व गणेश भोसले यांनी सांगितले.
जेजुरी शहराला नाझरे धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अपुर्या पावसामळे धरणातील पाणीसाठा शुक्रवारी (दि. 15) संपुष्टात येणार असल्याने पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होऊ लागले होते. जेजुरी शहराला पाणीपुरवठा करणारी दुसरी पर्यायी योजना मांडकी योजना नादुरुस्त व वीज बिल थकल्याने बंद पडली होती. ही योजना सुरू करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी सचिन पेशवे, गणेश भोसले यांनीमाजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी पालिकेचा या संदर्भातील प्रस्ताव तसेच कार्यकर्त्यांच्या मागणीची दखल घेऊन मुंबई वीज वितरणाच्या अभियंत्यांना विनंती करून वीज जोडणी पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
चौकट : 12 समान हप्ते
जेजुरी पालिकेची या योजनेवरील वीज बिलाची थकबाकी ही 2 कोटी 39 लाख 96 हजार रुपये होती. यापैकी 30 लाख रुपये पहिला हप्ता व 12 समान हप्त्यात उर्वरित रक्कम भरण्याबाबत करार झाले आहेत. जेजुरी नगरपालिकेने वीज बिलाचा पहिला हप्ता 30 लाख रुपये भरले असून माडकी पंपहाऊसमध्ये ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. लवकरच या योजनेतून जेजुरी शहरला नियमितपणे पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे जिल्हा भाजपा कार्यकारिणीचे सदस्य सचिन पेशवे तसेच जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष गणेश भोसले यांनी सांगितले.