एसटीचे पुणे विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांची माहिती
मंचर – गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या मंचर (ता. आंबेगाव) एसटी आगार लवकरच सुरू होणार असून, आगार सुरू करण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील संगणक प्रणाली व वर्कशॉप सुसज्ज ठेवण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले असल्याची माहिती एसटीचे पुणे विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांनी दिली.
गेल्या 30 ते 40 वर्षांपासून मंचर येथे स्वतंत्र एसटी आगर व्हावे, अशी मागणी आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी केली होती. आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी राजगुरूनगर व नारायणगाव आगाराच्या एसटी महामंडळाच्या बसवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे अनेकदा मंचर आणि घोडेगाव एसटी स्टॅंडवर वेळेत बस उपलब्ध होत नव्हत्या.
विद्यार्थी, नागरिक, महिला यांचे प्रचंड हाल होत होते. याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यात स्वतंत्र एसटी आगार व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर मंचर जवळील तांबडेमळा येथे 5 एकर जागेत स्वतंत्र एसटी आगार मंजूर करण्यात आले, त सेच एसटी आगाराचे कामही चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, एसटी आगाराचे लागणारे मनुष्यबळ, साहित्य उपलब्ध होत नव्हते.
याबाबतही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा करत सर्व साहित्य, चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, संगणक प्रणाली वर्कशॉप , इत्यादी बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत. मंचर येथील एसटी आगार सुरू झाल्यानंतर आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, कॉलेज तरुण, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना मोठा दिलासा मिळणार
असून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागापासून ते पूर्व भाग व पुणे मुंबई येथेही सर्वांना सुरळीत व सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
आगारप्रमुखांसह कर्मचारी रुजू
मंचर येथील एसटी आगार लवकरच सुरू करण्याचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राज्य परिमंडळ यांनी आदेश दिले असून मंचर एसटी आगारातील संगणक संच व वर्कशॉप सुसज्ज ठेवण्याचे आदेश अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आले आहेत. राजगुरुनगर आगाराची पत्रव्यवहार करण्यात आला असून राजगुरुनगर आगार आणि नारायणगाव आगारातील 25 एसटी बस मंचर आगारात उपलब्ध करण्यात येणार आहेत. बसचालक 56, वाहक 56, वर्कशॉप कर्मचारी 22 अशी नेमणूक करण्यात येणार आहे. मंचर आगार प्रमुख म्हणून बालाजी सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक साधना कालेकर, सहायक वाहतूक निरीक्षक एम. डी. विटे येथे रुजू झाले आहेत.