शिवनेरीवरून आज प्रारंभ – सत्यशील शेरकर
ओझर – शेतकरी विरोधी धोरण राबविणार्या व शेतकर्यांना वार्यावर सोडणार्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात 27 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात शेतकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीत बुधवारी (दि.27) शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी पायथा, जुन्नर येथून होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली.
शेरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले, शिवसेनेचे जिल्हा संघटक संभाजी तांबे, माजी जि.प.सदस्य शरद लेंडे, विजय कुर्हाडे, गुलाब पारखे, दिलीप बाह्मणे, मंगेश काकडे, तुळशीराम भोईर, नांगरे गुरुजी, शाम माळी, मोहन बांगर, संतोष जाधव आदी जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
माऊली खंडागळे म्हणाले की, राज्य व केंद्र सरकारच्या काळात झालेल्या शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला बाजार भाव मिळत नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे आदी प्रश्नांवर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांच्या अन्य खासदारांनी केली असता त्यांना निलंबित करण्यात आले म्हणून तसेच आदी शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नर-ओतूर-आळेफाटा-नारायणगाव-कळंब-मंचर-राजगुरुनगर -चाकण-शिरूर-बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे व मोर्चाच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (दि. 30) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दुपारी 3 वाजता सांगता सभेने होणार आहे.
सांगता सभेला दिग्गजांची उपस्थिती
सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे आदी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे.