मंचर मुस्लीम समाजाच्या वतीने निषेध मोर्चा
मंचर – इस्राइल हा दहशदवादी देश असून या देशाने आंतरराष्ट्रीय युद्धाचा करार मोडीत काढला आहे. ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी हल्ले करत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी केली आहे. आजपर्यंत 8 हजार लोक मारले असून त्यामध्ये 2 हजार बालकांचा समावेश आहे. हल्ला केलेल्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही, जेवणासाठी अन्न नाही, जखमी नागरिकांना औषधोपचार मिळत नसून रुगणालयावरही हवाई हल्ला केला असून त्यात पंधराशे लोक मरण पावले आहेत, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे आंबेगाव तालुका प्रमुख राजू इनामदार यांनी केले.
फिलिस्तीन येथे इस्रायलकडून वारंवार हवाई हल्ले होत असून, यामध्ये लहान मुले, नागरिकांचा अमानुषपणे बळी जात असून अशा या हुकूमशहा इस्रायलच्या विरोधात मंचर (ता. आंबेगाव) येथे मुस्लीम समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी इनामदार बोलत होते. मंचर (ता. आंबेगाव) येथील मारुती मंदिर येथून निषेध मोर्चाला सुरवात करण्यात आली.
छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे आंबेगाव तालुका प्रमुख राजू इनामदार यांनी इस्राइल देशाचा निषेध व्यक्त केला. फिलिस्तीन देशावर हल्ला करताना इस्रायलने संयुक्त राष्ट्राचे सर्व नियम तोडून हा हल्ला केला आहे. ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते त्या ठिकाणी हल्ला करायचा नाही, असा नियम असतानाही इस्रायलने हवाई हल्ला करत मनुष्यहानी केली आहे.
यामुळे त्यांच्या या कृत्याचा आम्ही सर्व मुस्लीम बांधव निषेध व्यक्त करीत आहोत. यावेळी अल्लु भाई इनामदार, रहेबर मीर, इरफान काझी मौलाना, वसीम जयदी अमानत मीर मन्सूर शेख, हैदर मिर्झा, अली हसन इनामदार या सर्व मुस्लीम समाजाचे बांधव उपस्थित होते.