पुणे – डेटिंग ऍपद्वारे हनिट्रॅप रचण्याचे प्रकार शहरात मागील काही दिवसांत घडत होते. बदनामीच्या भीतीने अनेक जण तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र, काहींनी धाडस दाखवून तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपींचा माग काढला. यामधील “बंटी-बबली’चे कारनामे पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
“सीकिंग ऍडव्हेंचर डेटिंग ऍप’द्वारे संपर्क साधून व्यक्तींना लॉजवर बोलवले जायचे. तेथील तरुणी मित्राला बोलावून घेत पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल करत लुटत होती. याप्रकरणी तुर्भे येथून नितीश सिंग (28, मूळ बिहार, सध्या दिल्ली) आणि उत्तराखंड येथील 28 वर्षीय महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. आतापर्यंत त्यांनी पुण्यातील तिघांना लुटल्याचे समोर आले. त्यामध्ये व्यावसायिक आणि सीए अशा व्यक्तींचा समावेश आहे.
इतर राज्यांतही त्यांनी असे गुन्हे केले आहेत. मागील आठवड्यात याच ऍपद्वारे संपर्क करून त्यांनी एका व्यावसायिकाला लुटल्याची घटना खराडी परिसरात घडली होती. याबाबत त्याने फिर्याद दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, आश्विनी पाटील, अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, सागर केकान, तुषार भिवरकर, अमेय राणा, इम्रान नदाफ, मनीषा पुकाळे यांच्या पथकाने केली.
अशी व्हायची फसवणूक
आरोपी महिला ऍपद्वारे व्यक्तीसोबत संपर्क साधायची. आकर्षक फोटो पाठवून त्याला हॉटेलमध्ये खोली आरक्षित करण्यास सांगायची. खोलीत प्रवेश करताच साथीदार नितीश हादेखील यायचा. हे दोघे समोरच्या व्यक्तीला बेदम चोप देत. त्यानंतर रोकड, सोन्याचा ऐवज लंपास करायचे. अनेकांकडून ती ऑनलाइन पैसे घ्यायची. लुटले गेलेले लोक आंबटशौकीन असल्यामुळे तक्रार देत नव्हते. तर, पोलिसांत गेल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेल; अशी धमकी बंटी-बबली देत होते. यामुळे पीडित व्यक्ती गप्प बसत होता.
“दोघा आरोपींनी डेटिंग ऍपद्वारे संपर्क करून नागरिकांना लुटले आहे. आतापर्यंत असे तीन प्रकार समोर आले आहेत. याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असा प्रकार कोणासोबत घडला असेल, तर त्यांनी गुन्हे शाखेला संपर्क करावा.” – भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा
असा केला तपास…
पोलिसांनी यूपीआय ट्रान्झॅक्शनद्वारे आरोपींचा मोबाइल क्रमांक आणि पत्ता शोधला. त्यावेळी ते पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजले. तांत्रिक तपासाद्वारे पोलीस कर्मचारी तुषार भिवरकर, सागर केकान यांनी दोघांना तुर्भे परिसरात शोधले. त्यानंतर गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांची मदत घेत एका पंचतारांकित हॉटेल परिसरातून त्यांना ताब्यात घेतले.
आणखी एक फसवणूक
“सीकिंग ऍडव्हेंचर ऍप’द्वारे फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये ग्राफिक्स डिझायनला त्याच्या घरात जाऊन जोडप्याने मारहाण करत तब्बल चार लाख रुपये ऑनलाइन वर्ग करून घेतले. सुरुवातीला त्याला लॉजवर बोलवण्यात आले होते. मात्र, त्याने नकार दिल्यावर आरोपी थेट त्याच्या घरात घुसले. विमानतळ हद्दीत हा प्रकार घडला.