उपमुख्यमंत्री अजित पवार : दूध संघाच्या सभेत संचालक, अधिकारी धारेवर
बारामती – तुमचा आवाका किती, मी राज्य सांभाळतो, तुम्ही एवढा-एवढा दूध संघ सांभाळला तर मला शिकवता का, व्यवसाय व्यवसायाच्या पद्धतीने झाला पाहिजे. माझ्याकडे वेळ नाही, नाही तर मी संचालक मंडळाला सुतासारखे सरळ केले असते. दूध संघाचा कारभार सुधारा; अन्यथा मला विचार करावा लागेल, अशा तीव्र शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दूध संघाच्या संचालक मंडळासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना फटकारत समज दिली.
बारामती दुध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी संघाच्या कारभारावरुन आक्रमक होत संचालक मंडळाला धारेवर धरले.पवार म्हणाले, संचालक मंडळाने दूध पावडर प्रकल्पाची माझ्याकडे विचारणा केली आहे. पण या प्रकल्पात गुंतवणूक करताना किती खर्च येणार, कर्ज किती घेणार, प्रकल्पाची किंमत किती, मार्केट आहे का? याचा विचार केला का ? असा सवाल पवार यांनी संचालक मंडळाला केला.
पवार म्हणाले, शंभर लिटर दूधातून साडे आठ किलो पावडर तयार होते. ते विकले तर साडेतीन हजार रुपये मिळतील. पावडर विकली तर दोन हजार रुपये मिळतील. अन्य लोकांनी पावडरीचे प्रकल्प सुरु केले. ते घाट्यात गेले आहेत. इथे रिकव्हरी रेकॉर्ड ठेवलेले नाही. दूधासह उपपदार्थांची विक्री वाढण्यासाठी काय प्रयत्न केले. ते मला दाखवा.
बारामतीच्या नावाने हा संघ ओळखला जातो. पुणे, पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या पाऊण कोटी आहे. ते मार्केट आपण का मिळवत नाही. तेथे विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न का होत नाहीत, मार्केर्टींग नेटवर्कमध्ये संवादाचा अभाव आहे. आम्ही पगार, जबाबदारी देतो. मग काय केले जाते. ब्रॅण्डींग, प्रमोशनमध्ये कमी पडतोय. त्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत, अशी त्यांनी विचारणा केली.
देश-विदेशात, राज्यात फिरत असताना आम्हाला विमानात बारामतीच्या डायनामिक्स डेअरीने तयार केलेले प्रॉडक्ट मिळतात. त्यावर “मेड इन बारामती’ बघून आम्हाला आनंद होतो. डायनामिक्स संघाकडून दूध घेते. त्यांचे नेस्ले, ब्रिटानिया ब्रॅण्ड जगभर पोहोचले आहेत.
नातेवाईकांचा मुलाहिजा ठेवत नाही
पवार म्हणाले, कोणाला नमस्कार न घालता, चहा न पाजता तुम्ही दूध संघावर संचालक, चेअरमन, व्हाइस चेअरमन झाला आहेत. फक्त लग्न पत्रिकेवर प्रेषक म्हणून नाव टाकण्यापुरती पदे वापरू नका. दुसऱ्यांचे पशुखाद्य खपतेय, तुमचे का खपत नाही, तुम्ही कशात मागे पडताय, इथला एचआर विभाग असून नसल्यासारखा आहे. त्याकडे लक्ष देणे एमडींचे काम नाही का, ते जर नीट काम करत नसतील तर संचालक मंडळाने त्यांना बाजूला करावे. मी माझा नातेवाईक असला तरी कोणाचा मुलाहिजा ठेवत नाही. कारभार सुधारा, अन्यथा मला विचार करावा लागेल, असे देखील पवार यांनी सुनावले.
लग्नपत्रिकेवरील नावासाठी मिरवू नका
सुधारणा करण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. केवळ लग्न पत्रिकेवर प्रेषक म्हणून नाव टाकायला, मिरवायला दिलेले नाही. दूध संघाबरोबर सर्वच संस्थांच्या संचालक मंडळानेही हे ध्यानात घ्यावे. आपण आज असू, उद्या नसू. काळाचे निमंत्रण आल्यावर सगळ्यांनाच जायचे आहे. पण संस्था कायम राहणार आहे. ती टिकविण्यासाठी, उत्तम चालविण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना देखील पवार यांनी केली.