वडगाव मावळ – राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या पवार कुटुंबातील उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यापाठोपाठ आता आमदार रोहित पवार यांच्यादेखील शुभेच्छा बॅनर वर “भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर झळकले. हे बॅनर रोहित पवार यांच्या राजकारणातील सक्रीय झाल्याचे दर्शवित आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून विविध घडमोडींच्या माध्यमातून आमदार रोहित पवार नेहमीच चर्चेत असतात. त्यात अजित पवारांनी राज्य सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात आमदार रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेतात की काय अशीदेखील चर्चा सुरू असताना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर लागल्याने राजकारणात खमंग चर्चा रंगू लागली आहे.
अजित पवार यांच्या वेगळ्या भुमिकेनंतर काही दिवसांपासून रोहित पवार हे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घालू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदाची घोषणा करण्यासाठी ते शहरात आले होते. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शहरातील गणेश मंडळांच्या आरत्यांना हजेरी लावत जनसंपर्क वाढवायला सुरूवात केली आहे.
पवार कुटुंबाची राजकारणातील चौथी पिढी म्हणून आमदार रोहित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांचा 29 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या एका समर्थकाने मावळातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से येथील टोल नाक्यावर लावलेल्या शुभेच्छा बॅनर वर भावी मुख्यमंत्री रोहित पवार असा उल्लेख केला असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.