महायुती एकत्र लढणार की, “एकला चलो रे’ हे गुलदस्त्यातच
निवृत्तीनगर – राज्यात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) व भाजपा यांची सध्या महायुती आहे. त्यातच तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे अद्यापही तटस्थ म्हणजे ते अजित पवार किंवा शरद पवार यांच्या गटात अद्यापही थेटपणे गेलेले नाही. त्यातच तीनपक्ष एकत्र असून तीनही पक्षाचे उमेदवार हे तुल्यबळ असल्याने आगामी निवडणुकीत महायुतीला उमेदवार निश्चित करताना डोकेदुखी होणार, हे मात्र निश्चित!
पूर्वीपासून जुन्नर तालुक्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व काही अंशी भाजपा हे पक्ष कार्यरत असताना यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना हे तुल्यबळ पक्ष होते. मागील पंचवार्षिक निवडणूक होण्यापूर्वी मूळ शिवसेनेतून आशा बुचके बाहेर पडल्या तर मनसेचे एकमेव आमदार म्हणून प्रसिद्धी मिळवलेले शरद सोनवणे यांची शिवसेनेत एन्ट्री झाली.
पुढे जाऊन शिवसेनेत बंडाळी होऊन शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट झाल्याने तालुका पातळीवर शिवसेनेच्या नेत्यांचे व मतांचे विभाजन झाले. यामध्ये शिवसेनेचे शरद सोनवणे हे शिंदे गटासोबत गेले. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार व अजित पवार हे गट झाल्याने तालुक्यातील नेत्यांसमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहे.
तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी त्यांची भूमिका तटस्थ असल्याचे सांगितले असले तरी तालुक्याचा विकास करण्यासाठी निधी लागतो आणि तो निधी अजित पवारच देऊ शकत असल्याने बेनके यांचा कल अजित पवार गटाकडे जास्त दिसत असून अजित पवारांना अर्थमंत्रिपद मिळाल्यानंतर नुकतीच बेनके यांनी मोठ्या प्रमाणात निधी तालुक्यात आणला असून अनेक विकासकामे मार्गी लावले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आमदार बेनके जो निर्णय घेतील तो मान्य करू, असे सांगत आहेत. तालुक्यातील या दोन तुल्यबळ पक्षाच्या फुटीनंतर कुणाचे पारडे नक्की जड? हे सांगणे अवघड होऊन बसले असून प्रत्येक नेता आपणच श्रेष्ठ असल्याचे सांगत आहे.
भाजपही घेतोय उभारी
आशा बुचके यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मागील पंचवार्षिक निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. आता त्या भाजपमध्ये गेल्यात. त्या जुन्नर तालुक्यात केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असल्याने त्यांना तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच गावपतळीवरील अनेक प्रश्न सोडवत असल्याने भाजपा पक्ष तालुक्यात उभारी घेताना दिसत आहेत.
शिवसेनेला सर्वाधिक फटका
जुन्नर तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पक्ष फुटीचा चांगलाच फटका बसला आहे या गटाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे करत आहेत. तालुक्यातील जनमानसात त्यांचा दांडगा संपर्क असून निष्ठावंत कार्यकर्ते व सैनिक त्यांच्याबरोबर आहेत तर माजी आमदार शरद सोनवणे हे शिंदे गटाबरोबर गेल्याने मूळ शिवसैनिकांचे विभाजन होऊन काही शिवसैनिक त्यांच्याबरोबर गेले आहेत तेही आपली मोट बांधताना दिसत आहेत.
शेरकरांना आघाडीची ताकद मिळणार?
विघ्नहर साखर कारखाना, पंचक्रोशीत ज्ञात असलेली शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्था व तालुक्यातील तरुणांची एक मोठी फळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यासोबत असल्याने शेरकर यांचा तालुक्यात चांगला बोलबाला आहे त्यातूनच नुकतीच शरद पवार यांनी जुन्नर दौऱ्यादरम्यान सत्यशील शेरकर यांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत, अशा परिस्थितीत आघाडीतून त्यांना ताकद व संधी मिळाल्यास ते विधानसभा लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पवार नवीन चेहऱ्याला संधी देणार?
राज्य पातळीवर उद्धव ठाकरे गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) यांची आघाडी असल्याने तालुक्यात त्यांचे एकत्रित रित्या पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. तर शरद पवार महाविकास आघाडीच्या मार्फत नवीन चेहऱ्याला तालुक्यात संधी देणार का? हे येणारी वेळच ठरवणार आहे.