जांबूत : पिंपरखेड (ता. शिरुर) येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाज बांधवांनी रविवार (दि.29) साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या कालावधीत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी न लावता वेळकाढूपणाचे धोरण अवलंबल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनाला साद देत पिंपरखेड गावातील मराठा बांधवांनी यापूर्वी राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. रविवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
पिंपरखेड गावातील हनुमान मंदिरासमोर उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नरेंद्र बोंबे व हेमंत नरवडे यांनी पुष्पहार अर्पण करून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, अशी जोरदार घोषणाबाजी मराठा बांधवांनी केली.
यावेळी निवृत्ती बोंबे, दिलीप बोंबे, विकास वरे, शरद बोंबे, प्रफुल्ल बोंबे, विक्रम पोखरकर, शांताराम वरे, बाळासाहेब बोंबे, पोपट बोंबे, किरण ढोमे, सचिन बोऱ्हाडे, सचिन बोंबे, आबाजी पोखरकर आदीसह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.