सविंदणे – मनसेचे माजी शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. त्या पक्षात ते रमलेच नाही. शिवसेनेला अलविदा करीत पुन्हा मनसेत ते परतल्याने मनसेला शिरुर शहरात ऊभारी मिळणार आहे.
मनसेच्या शिरूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रविवारी (दि.6) येथे झालेल्या बैठकीत दरेकर यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना पक्षसंघटना व आगामी भूमिका त्यांनी विषद केली.
मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल दरेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, किरण गव्हाणे, विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक श्याम बेंडभर, सरचिटणीस नीलेश बाहेती आदी यावेळी उपस्थित होते.
दरेकर म्हणाले की, पक्षबांधणी करताना प्रत्येक गावात बैठका घेऊन पक्षाचा फलक लावण्याचे नियोजन आहे. नाका तेथे शाखा ही मोहिम अधिक जोमाने राबविली जाईल. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी स्वागत केले. मनसे विधी विभागाचे तालुकाध्यक्ष ऍड. आदित्य मैड यांनी प्रास्तविक केले. मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे यांनी सूत्रसंचालन केले. मनसे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवीराज लेंडे यांनी आभार मानले.
मनसेचे शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी आठ महिन्यांपूर्वी मनसेचा त्याग करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांत प्रवेश केला होता. मात्र, तेथे ते मनसे रमलेच नाहीत. 22 एप्रिलला त्यांनी शिवसेनेशी फारकत घेतली. दरम्यान, शिरूर तालुक्यातीलच असलेल्या रामदास दरेकर यांची मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या सत्कार सोहळ्यात घोगरे हे स्वगृही परतले.
घरवापसीनिमित्त रामदास दरेकर, हेमंत बत्ते, महिबूब सय्यद यांनी भगवे उपरणे घालून आणि मनसेचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी शहराध्यक्ष म्हणून काम करेल. मला लवकरच मोठी जबाबदारी पक्ष देईल. मी जोपर्यंत हायत आहे. तोपर्यंत मनसे हा पक्ष व राज ठाकरे यांचा झेंडा सोडणार नाही. यापुढे हेमंत बत्ते, रामदास दरेकर, महिबूबभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहरप्रमुख अविनाश घोगरे यांनी सांगितले.