पिंपळे गुरव – एसबीसी व ओबीसीमधील सर्व घटक एकत्र येऊन आपली संख्या दाखवून मोठ्या प्रमाणात शासनाला जागृत करण्याची गरज आहे. तसेच भविष्यामध्ये विणकर समाजाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळासाठी मदत करण्यात येईल, असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समिती व देवांग कोष्टी समाज आयोजित “राष्ट्रीय विणकर दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील साळी, कोष्टी, पद्मशाळी यांची एकजूट दिसून आली. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले येथे करण्यात आले होते. या वेळी मंत्री भुजबळ बोलत होते.
या कार्यक्रमाकरिता संयोजक सुरेश तावरे यांनी प्रस्तावना करून आरक्षण बचाव संदर्भात माहिती दिली. तसेच समाजातील यशस्वी उद्योजक व अधिकारी यांचा सन्मान व सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गोडसे, पंडित ढवळे व दत्तात्र ढगे यांनी केले. प्रमुख उपस्थितीमध्ये हिरालाल पगडाल संगमनेर यांनी एसबीसी चळवळ व आत्तापर्यंतच्या कार्याची भूमिका स्पष्ट केली.
या वेळी विणकर सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे, चंद्रकांत अतिगीडद, विटा यांत्रमाग संघटनाचे अध्यक्ष किरण तारळेकर, विश्वनाथ मुसळे, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, संगमनेर कोष्टी मंडळाचे कार्यकर्ते उमेश ढोले, शशांक खोजे चौंडेश्वरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन संजय कांबळे, देवांग कोष्टी समाजातील सर्व कार्यकारिणी सदस्य, महिला मंडळ उपस्थित होते.
या कार्यक्रमाकरिता इचलकरंजी, विटा, सांगली, मुंबई, ठाणे, बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, परभणी, पुणे, पिंपरी, चिंचवड, सोलापूर, वडगाव आदी भागांतून बहुसंख्येने विणकर समाज मान्यवर उपस्थित राहून समाजाची एकी दिसून आली. दत्तात्रय ढगे यांनी आभार मानले.