तीन महिला सदस्यांकडून भ्रष्ट कारभाराचे आरोप
मोरगाव – बारामती तालुक्यातील तरडोली ग्रामपंचायतीच्या तीन महिला सदस्यांनी सरपंच विद्या भापकर यांच्या मनमानी कारभाराच्या विरुद्ध व त्यांनी केलेल्या शासकीय निधीच्या गैरवापराबद्दल उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
अश्विनी श्रीकांत गाडे, स्वाती सतीश गायकवाड, अनिता उत्तम पवार या सदस्यांनी येथील सरपंच विद्या हनुमंत भापकर यांचा मनमानी कारभार, पतीचा कामकाजामधील हस्तक्षेप, याविरोधात उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर सदस्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
(दि.12) सकाळपासून हे उपोषण सुरू आहे. विस्तार अधिकारी चांदगुडे व सुपा पोलीस स्टेशनचे नागनाथ पाटील यांनी तोडग्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. दरम्यान, विस्तार अधिकारी चांदगुडे यांनी चार सदस्यीय समिती गठन केली आहे.
आरोप खोटे, सुडबुद्धीने- भापकर
याबाबत तरडोलीचे सरपंच विद्या हनुमंत भापकर यांच्याशी संपर्क साधला असता तरडोली गावामध्ये पन्नास वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच विकासकामे होत असल्याने विकासाला अडथळा आणण्यासाठी जाणीवपूर्वक विरोधकांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. सर्व आरोप खोटे व सुडबुद्धीने केले आहेत.