पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अनेक नागरिक सामायिक गट नंबर असलेल्या जागेमध्ये घरे बांधतात. त्यामुळे खरेदी विक्री शिवाय स्थानिकांच्या घरांची बांधकामे होतात. यापूर्वी पालिकेच्या करसंकलन विभागाकडे 100 च्या स्टॅप पेपरवर वाटणीपत्र करुन नोंदी होत होत्या. मात्र, सध्या या नोंदी बंद करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे या नोंदी पुन्हा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणी यश आले असून स्टॅम्पपेपरवर खरेदी केलेल्या मालमत्तांची पालिका दप्तरी नोंद करण्यात येणार असल्याचे परिपत्रक पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जारी केले आहे.
शहरातील स्थानिक नागरिकांच्या घराची जागा अत्यंत कमी असूनही वाटपपत्रासाठी संपूर्ण जागेची स्टॅप ड्युटी भरून वाटपपत्र करावे लागत होते. बहुतेक वेळेस घराच्या बांधकामापेक्षा सामायिक जागेचे मूल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. अंतर्गत वादामुळे सर्वजन एकत्र येऊन वाटणीपत्रासाठी उपस्थित रहात नाहीत. यामुळे मिळकत कराची नोंद होत नसल्याने कर भरु शकत नव्हते.
याचा विचार करून माजी नगरसेवक भालेकर यांनी 500 स्टॅप पेपरवर वाटणीपत्र करुन नोंदणी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. या मागणीवर पवार यांनी तत्काळ आयुक्त सिंह यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नोटराईज स्टॅम्पपेपरचे आधारे झालेले व्यवहार, मूळ मालकाचे नाव नोंदवून खरेदीदाराचे नाव भोगवटादार म्हणून नोंदविण्यात येणार आहे. तसेच या मालमत्ता नोंदणीची झाल्यानंतर मालमत्ता कराचे बिलही देण्यात येणार आहे. त्यामुळे असे मालमत्ता धारक करकक्षेत येणार असल्याने पालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडणार असल्याचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी सांगितले आहे.