वाघोली : पुणे जिल्ह्याच्या पूर्व हवेलीच्या भागातून जाणाऱ्या रिंग रोडला रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मिळवून देण्यासाठी आता भाजप कार्यकारणी मैदानात उतरले असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील व पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा भाजप वतीने शेतकऱ्याच्या बाजूने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव पाटील यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याच्या पुर्व भागाचा एम.एस.आर.डी.सी.चा रिंगरोड मंजूर झाला अशी अनेक वेळा प्रशासनाकडून दिशाभूल करून मार्च महिन्यात अखेर हा फेरआखणी केलेला रिंगरोड मंजूर झाला. यापूर्वीही सन 2016 साली या रस्त्याला मान्यता दिली होती.
ह्या रिंग रोड बाबत वाडेबोल्हाई, गावडेवाडी, बिवरी, प्रयागधाम, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, वडकी या गावातील शेतकर्यानी सन 2016 पासून या रिंगरोडमधील सर्व त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या बाधित शेतकर्यानी ह्या संपूर्ण रिंगरोडची आखणी शास्त्रीय दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या बरोबर नसल्याचे देखील लेखी कळविले होते.
पुर्व भागाला यापूर्वीचे दोन रिंगरोड मंजूर आहेत ते जाणीवपूर्वक विकसित केले जात नाही. ते विकसित करणे गरजेचे आहे. हे जवळचे रस्ते आहेत. तसेच पी.एम.आर.डी.ए. चे बैठकीत माजी मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार हा एम.एस.आर.डी.सी.चा रस्ता पी.एम.आर.डी.ए.चे रिंगरोडपासून 20 ते 25 किमी अंतरावर असावा असे ठरले होते. तसेच हा रिंगरोड हितावह नाही व हा रस्ता रद्द करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घ्यावा असे नगररचना पुणे यांनीही कळविले होते.
तसेच या अन्यायाविरूध्द बाधित शेतकर्यानी रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेच्या वतीने मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अशी माहिती रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेचे महेंद्र झेंडे,काळूराम गोते, प्रभाकर कामठे यांनी दिली.
फेरबदलाप्रमाणे लवकरच दुरुस्त याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असून महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील व पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा भाजप वतीने शेतकऱ्याच्या बाजूने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव पाटील यांनी सांगितले.
रिंग रोडची आखणी प्रयागधाम, बिवरी, गावडेवाडी, वाडेबोल्हाई, ते मरकळ सोळू या ठिकाणची आखणी तशीच ठेवण्यात आली. यामध्ये बदल केला नाही. याबाबत प्रयागधाम, बिवरी, गावडेवाडी, वाडेबोल्हाई, शेतकर्यांची बिवरी (गोते) येथे बैठक झाली. त्यावेळी शेतकर्यांनी या गावातील आखणीस विरोध केला आहे.
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागातून जाणाऱ्या रिंग रोड बाबत शेतकऱ्यांनी तातडीने भाजप कार्यकारिणीशी संपर्क साधून आपली समस्या मांडावी. भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
दादासाहेब सातव पाटील उपाध्यक्ष, पुणे जिल्हा भाजप
पुणे जिल्ह्यातील रिंग रोड बाबत शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरण बाबत शेतकऱ्यांना विचारात न घेता जर प्रशासनाने निर्णय घेतला तर भाजपच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, दादासाहेब सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
संदीप सातव, संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा. भाजप युवा मोर्चा