सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील : मंचर उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा सुरू
मंचर – कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती आजारी पडल्यास सरकारी रुग्णालयात त्याला उपचार घेण्यासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात व त्याच्यावर सगळे उपचार मोफत व्हावेत, केस पेपरचे पैसे देखील सरकार भरणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पुढील काळात सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे उपजिल्हा रुग्णालयात आयोजित डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिले पीपीपी तत्त्वानुसार सिटीस्कॅन या अद्ययावत तपासणी केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटनासाठी शरद बॅंकेचे अध्यक्ष व रुग्ण कल्याण समिती मार्गदर्शक देवेंद्र शहा, सुभाषराव मोरमारे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डी. के. वळसे पाटील, जगदीश घिसे, नीळकंठ काळे, दत्ताशेठ थोरात,
सुहास बानखेले, नितीन थोरात, विकास बाणखेले, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. परिमल सावंत, रूपेश दागर, रवी लोमटे व इतर सहकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व सहकारी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य डी. के. वळसे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजयकुमार भवारी यांनी केले.
आंबेगाव तालुक्यात लवकरच 100 बेडचे नवीन हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, घोडेगाव येथील रुग्णालयासाठी नवीन इमारत व अत्याधुनिक सुविधा असणारे रुग्णालयाचे कामवकरच सुरू होणार आहे. याचबरोबर तळेघर येथे 31 खाटांचे रुग्णालय, मलठण येथे 30, पाबळ येथे 30 घाटांचे रुग्णालय मंजूर केले असून, त्याचे कामही लवक रच सुरू होणार आहे. सरकारी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्स यांना आपला आधार वाटायला हवा. सर्वांनी त्यांच्याबरोबर सहकार्याची भूमिका ठेवावी, असेही वळसे पाटील म्हणाले.