ओझर -दिवाळी पाडव्याच्या सकाळी 5 वाजता श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) श्री विघ्नहराचे मंदिर तब्बल आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मात्र, शासनाच्या नियम शिस्तीचे काटेकोर पालन करून दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देवस्थन ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे यांनी दिली.
पाडव्यादिवशी सकाळी 7.30 वाजता देवस्थान ट्रस्टचे पुजारी हेरंब जोशी, भालचंद्र जोशी, चिंतामणी जोशी, मंगेश जोशी, जयेश जोशी, विघ्नराजेद्र जोशी यांच्या उपस्थितीत आरती संपन्न झाली. या आरतीचा मान देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व अश्वमेघ युवामंचाचे अध्यक्ष गणेश कवडे आणि ओझर गावच्या आदर्श सरपंच अस्मिता कवडे यांना मिळाला.
देवस्थान ट्रस्टने येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येणारा प्रत्येक भाविक मास्क घालून मंदिरात प्रवेश करीत आहेत. देवस्थान ट्रस्टचे कर्मचाऱ्यांना सुरक्षा म्हणून फेसशील्ड देण्यात आले आहेत.